Vinay Kore on sambhajiraje chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे यांनी इशारा देताच आमदार विनय कोरे म्हणाले....
आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्याने विशाळगडाची विषन्न अवस्था झाली आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी उत्तर देत बाजू मांडली आहे.
vinay kore on sambhajiraje chhatrapati : आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्याने विशाळगडाची विषन्न अवस्था झाली आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी उत्तर देत बाजू मांडली आहे. इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करणे योग्य वाटत नसल्याचे आमदार विनय कोरे यांनी म्हटले आहे.
कोरे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे माझे मित्र आहेत. मात्र, विशाळगडाबाबत त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट गैरसमजातून केली आहे. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी. इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करणे योग्य वाटत नाही. विशाळगडाच्या अतिक्रमणाला चालना देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं नव्हतं, तर समन्वय साधण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने ही बैठक रद्द केली होती. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, पण अशा पद्धतीने पोस्ट करणे आणि याबाबत चर्चा करणे कसं काय घडलं हे मला कळत नाही. दरम्यान, विनय कोरे यांनी 19 तारखेला शिवप्रेमींसोबत बैठक घेऊन त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील. तसेच कायदेशीर बाबींचा आढावा घेतला जाईल. स्थानिकांसोबतही पुन्हा बैठका घेतल्या जातील, असे सांगितले.
संभाजीराजे यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून आम्ही जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली. मात्र या बैठकीत ही सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत?
आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे, तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवलीच पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या