कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लगावला.

Satej Patil Vs Rajesh Kshirsagar: कोल्हापुरात सुरू असलेल्या 100 कोटी रस्ते प्रकल्पावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काल (14 डिसेंबर) प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. सतेज पाटील यांनी रस्ते प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्यांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी केली. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पाटील यांनी 100 कोटींच्या रस्त्यावरून हल्लाबोल केल्यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला आहे. क्षीरसागर म्हणाले की, सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे. कुठल्याही मंचावर या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयारी असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की आम्ही किती प्रकल्प आणले, तुम्ही किती प्रकल आणले? पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकीच काहीच केलं नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.
महापालिकेच्या मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी..
दरम्यान, सतेज पाटील विधान परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की, कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली आहे. कामावरून ताशेरे ओढले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता व्यवस्थित नाही. आपण (एकनाथ शिंदे यांना उद्देशून) चांगल्या मनाने निधी मंजूर करून शंभर कोटी दिले यासाठी मी आभार मानतो. मात्र, रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का? याचा विचार करण्याची गरज असल्याचं पाटील म्हणाले. 100 कोटी दिले असले, तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव खाली असल्याचे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी राजकीय आरोप करत नाही आपल्याला माहित आहे. मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे? पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल, असा खोचक टोला लगावला.
100 कोटी रस्ते प्रकल्पाची दयनीय स्थिती
दरम्यान, कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवर 100 कोटींमधून कामे सुरु आहेत. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर केलेल्या रस्त्यांवर नव्याने सीलकोट करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी रस्ते करताना अर्धवट स्थितीत काम केल्याने कामाचा दर्जा राहिलेला नाही. कोणत्याच मार्गावर काम व्यवस्थित झालेलं नाही, अशी स्थिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























