Kolhapur Airport : कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरु, कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार; केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेचा प्रारंभ करताना कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
Kolhapur Airport : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. कोल्हापूर-बंगळूर विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिदे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन, तर कोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडिक (ऑनलाईन), खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळचे संचालक अनिल शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला. केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे जगभरात कोल्हापूरला ओळखले जाते. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आजवर 255 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कोल्हापूरचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी यापुढेही इथल्या विमानतळ विकासाला प्राधान्य देण्यात येईल. व्ही. के. सिंह म्हणाले की, मराठा साम्राज्यातील महत्वाचे ठिकाण असणारे कोल्हापूर श्री अंबाबाई मंदिरासह अन्य पर्यटन स्थळांसाठीही सर्वत्र परिचित आहे. भविष्यात कोल्हापूरमधून अधिकाधिक विमानसेवा सुरु होण्यासाठी तसेच अन्य शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. इंडिगोच्या कोल्हापूरमधून सुरु असणाऱ्या विमानसेवांची माहिती यावेळी इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंह यांनी दिली.
खासदार संजय मंडलिक म्हणाले की, कोल्हापूर- बंगळूर विमानसेवा पुन्हा सुरु झाल्याने कोल्हापुरच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. कोल्हापूर विमानतळ देशातील सर्व राज्यांना जोडण्यासाठी आणि विमानसेवेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास साधणे आवश्यक आहे. विविध शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा कोल्हापूर मधून सुरु होत आहेत. याला विमान प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून लवकरच कोल्हापूर विमानतळ हे देशातील महत्वपूर्ण विमानतळ ठरेल. खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना उद्योगपती कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आजवर कोल्हापूर विमानतळासाठी महत्वपूर्ण सहकार्य केले आहे. यापुढेही विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळाचा सातत्याने विकास होत असून विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती द्यावी. कोल्हापूरच्या प्रगतीसाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे ते म्हणाले. ही विमानसेवा कोल्हापूर येथून बंगळूरपर्यंत तसेच पुढे कोईमतूरपर्यंत असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाला विमानतळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या