Kolhapur Crime : आईला फोन करून त्रास दिल्याने शिक्षकावर कोयत्याने हल्ला, कदमवाडी प्रकरणाला वेगळे वळण
कदमवाडीमधील शिक्षकावर केलेल्या कोयता हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आईला फोनवरून त्रास देत असल्याने शिक्षकाला संपवण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली अल्पवयीन संशयितांनी मंगळवारी दिली.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरातील कदमवाडीमधील शाळेतील शिक्षकावर केलेल्या कोयता हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आईला फोनवरून त्रास देत असल्याने शिक्षकाला संपवण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली अल्पवयीन संशयितांनी मंगळवारी दिली. शिक्षकावर हल्ला प्रकरणात अल्पवयीन संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्या दोघांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोमवारी कोल्हापूर शहरात भरदिवसा शिक्षकाला शाळेतून बोलवून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. कदमवाडीतील संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूलमधील शिक्षक संजय सुतार यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. कदमवाडी चौकात शाळेतून बोलवून शिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिक्षक संजय सुतार यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर शाळेत शिक्षा केल्याच्या रागातून हल्ला केल्याची फिर्याद शिक्षकाने दिली होती. शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपास करून संशयितांना ताब्यात घेतले होते. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांना केवळ विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने हल्ला झाला नसावा असा संशय असल्याने पोलिसांनी तीन पथकांच्या माध्यमातून माहिती घेत संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर ज्या मुलाने हल्ला केला तोही या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे दिसून आले.
शिक्षकाकडून आईला फोनवरून त्रास देण्याची माहिती दोन दिवसांपूर्वी मुलाला कळाली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती कोणालाही न सांगितली नाही. त्याचवेळी त्यांनी शिक्षकाला संपवायचे असे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी हल्ला केल्याची माहिती चौकशी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिली. ताब्यात असलेली दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची नावे आणि इतर माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान, कुटुंबीयांकडून शिक्षकावर कोणतेही तक्रार आमच्याकडे केली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
शिक्षकावर पाच वार
दरम्यान, शिक्षक सुतार यांच्या डोक्यावर, मानेवर हातावर असे पाच वार झाले आहेत. त्यांच्यावर कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आणि शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी छोटी सुट्टी संपल्यावर विद्यार्थी वर्गात पोहोचले. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या तयारीसाठी बैठक सुरू असतानाच शाळेच्या मागील बाजूला उभी केलेली दुचाकी पडल्याचे सुतार यांना विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे ते बैठकीतून शाळेच्या मागील बाजूच्या दरवाजातून दुचाकी उभी करण्यासाठी गेले. त्यावेळी दबा धरून थांबलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत काही वार दुचाकीच्या सीटवर बसले, तर काही वार सुतार यांच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर लागल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
इतर महत्वाच्या बातम्या























