(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ichalkaranji : इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार, तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश : आमदार प्रकाश आवाडेंनी दिली माहिती
इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह त्याठिकाणी तहसिल कार्यालय सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्याची माहिती प्रकाश आवाडे यांनी दिली.
Ichalkaranji : इचलकरंजी शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह त्याठिकाणी तहसील कार्यालय सुरु करण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. यामुळे प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून इचलकरंजीला आता स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळणार असल्याचेही आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी शहराचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या 8 लाखापेक्षा अधिक आहे. सध्या इचलकरंजी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. या अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या कक्षेत कबनूर, कोरोची, रांगोळी, रेंदाळ व पट्टणकोडोली या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इचलकरंजी महानगरपालिका व हुपरी नगरपालिका यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
इचलकरंजी येथे उपविभागीय (प्रांत) कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालये, पोलिस उपअधिक्षक कार्यालय, तीन पोलिस ठाणी व इतर सरकारी आस्थापना अशी अनेक महत्वाची कार्यालये आहेत. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ असून इचलकरंजीत तहसिल कार्यालय नाही.
तहसिलदार कार्यालय हे हातकणंगले याठिकाणी असले तरी त्या तुलनेत जवळपास 60 टक्के काम हे इचलकरंजीतील अप्पर तहसिलदार कार्यालयात होत आहे. त्यामुळे इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे असून स्वतंत्र तालुका झाल्यास येथील कामे दृतगतीने होण्यास मदत होणार आहे. इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा व तहसिलदार कार्यालय व्हावे हा प्रस्ताव प्रदीर्घ काळापासून शासनाकडे प्रलंबित आहे.
इचलकरंजी शहराचा भौगोलिक विकास व कामे द्रुतगतीने होण्यासाठी इचलकरंजी येथे अप्पर तहसिलदार कार्यालयाऐवजी इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील कबनूर, कोरोची, चंदूर, तारदाळ व खोतवाडी या पाच गावांसह इचलकरंजीला स्वतंत्र तालुका म्हणून मंजूरी देऊन तहसिल कार्यालय सुरू व्हावे अशी मागणी सातत्याने केली आहे. या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना परिस्थितीची विस्तृत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने इचलकरंजी स्वतंत्र तालुका व तहसिलदार कार्यालय संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे प्रदीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेला प्रश्न निकाली निघाला असून इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.