Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Hasan Mushrif: पक्षात वर्षात दोन राजीनामा पडल्याने राष्ट्रवादीवर सडकून टीका सुरु आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, वर्षभरात दोन मंत्र्यांचा राजीनामा हा पक्षासाठी दुर्दैवी आहे.

Hasan Mushrif: पाच वर्ष आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळतं काँग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्ष होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचे खोचक टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले.
इचलकरंजीत आमची 25 जागांची मागणी
दरम्यान, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ म्हणाले की, आज कोल्हापूर महापालिका निवडणूक संदर्भात बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरलेला नाही. काल मी आणि प्रकाश आवाडे भेटलो, इचलकरंजीमध्येही19 नगरसेवक आमचे होते. आता आम्ही किती उमेदवार देणार याची लिस्ट दिली आहे. काल साधक बाधक चर्चा झाली आहे. आमची 25 जागांची मागणी आहे.
दोन मंत्र्यांचा राजीनामा पक्षासाठी दुर्दैवी
दुसरीकडे, पक्षात वर्षात दोन राजीनामा पडल्याने राष्ट्रवादीवर सडकून टीका सुरु आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, वर्षभरात दोन मंत्र्यांचा राजीनामा हा पक्षासाठी दुर्दैवी आहे. धनंजय मुंडे कशातही आरोपी नव्हते. मात्र, त्यावेळी एक परसेप्शन तयार झालं आणि त्यातून त्यांचा राजीनामा झाला. माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण ते पक्षात येण्यापूर्वीचं आहे. उच्च न्यायालयात या निकालाला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे.
शरद पवार गटाला कोणाचाही आधार राहिलेला नाही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर ते म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत देखील काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत देखील काही ठिकाणी एकत्र आघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मेळ राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणाचाही आधार राहिलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये बेबनाव तयार झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रत्येक पक्ष वेगळा आधार शोधत आहे.
पक्ष आणि पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र
पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणावर त्यांनी सांगितले की, पार्थ पवारांनी कालच माझी खोटी सही केल्याची तक्रार दिली आहे. पवारांना ते करायचं असतं तर ते स्वतः आले असते. कारण 99 टक्के भागीदारी त्यांची आहे. हे पक्ष आणि पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणी कितीही टार्गेट करायचा प्रयत्न केला तरी त्याचा फरक पडणार नाही. हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि जवळचा पक्ष आहे. काम करणारा नेता वक्तशीर म्हणून अजितदादांची ख्याती आहे. कोणी कितीही टार्गेट केलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या मनावर अधिराज्य करत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























