Kolhapur Nagarpalika election 2022 : ओबीसी आरक्षणाशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होणार
कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, कागल, कुरुंदवाड आणि मुरगूड नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Kolhapur Nagarpalika election 2022 : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश देताना राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा फटकारले. राज्य निवडणूक आयोगाने या निर्देशांचे पालन न केल्यास त्याला कोर्टाची अवमानना समजण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे घोषित झालेल्या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचे ही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या कडक टिप्पणीमुळे राज्यातील 92 नगरपरषदा आणि 3 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसरीकडे तगडा झटका बसल्याने राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, कागल, कुरुंदवाड आणि मुरगूड नगरपालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून यापूर्वी 356 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 18 ऑगस्टला मतदान होणार होते. मात्र, 20 जुलैला ओबीसी आरक्षणाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात होणार होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली.
ठाकरे सरकारकडून नेमण्यात आलेल्या बांठिया आयोगाच्या अहवाला हिरवा कंदिल दाखवत 27 टक्के आरक्षण मान्य केले. त्यामुळे यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुकीमध्येही ओबीसी आरक्षण लागू करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने आयोगाची गोची झाली आहे. त्यामुळे यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या जागांवर ओबीसी आरक्षणाशिवाय, तर उर्वरित घोषित झालेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षण असेल.