Hasan Mushrif ED Raid: हसन मुश्रीफांवर ईडीच्या छापेमारीत तब्बल 14 तास झाडाझडती; कोल्हापूर, कागल, पुण्यात एकाचवेळी छापेमारी
Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील मातब्बर नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने 14 तास छापेमारी केली.
Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) मातब्बर नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.
दुसरीकडे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. ईडी आणि भाजपविरोधात मुश्रीफ यांच्या समर्थकांनी कागल, कोल्हापूरमध्ये निदर्शने करत कारवाईचा निषेध केला.
तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही
दरम्यान, तब्बल 14 तास झालेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 14 तासांच्या चौकशीनंतर नाविद मुश्रीफ यांना कार्यकर्त्यांनी खाद्यांवर घेऊन जल्लोष करत जोरदार घोषणा दिल्या.
नाविद मुश्रीफ म्हणाले की, गेल्या पाच दिवसांपासून कागलमध्ये ईडीचा छापा टाकला जाणार असल्याची चर्चा होती. पण, अशा कारवाईला आपण घाबरत नाही. ईडीची जी कारवाई झाली आहे, त्यांना आम्ही शांतपणे उत्तरे दिली आहेत. त्यांना सहकार्य केले आहे. चौकशी करणे हे त्यांचे काम आहे. त्यांच्या कामात कोणताही अडथळा आणला नाही. त्यांची जी-जी माहिती हवी होती ती प्रत्येक माहिती दिली आहे. आवश्यक सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मात्र, या छाप्यातून त्यांना काहीही साबित होणार नाही, हा विश्वास आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते दिवसभर थांबून होते. ते सर्व आम्हाला धीर देण्यासाठी आले, त्यांचे आम्ही आभारी आहे.
हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप
या कारवाईचा व भाजपचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी मुश्रीफांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. याचबरोबर प्रकाश गाडेकर यांच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आमदार मुश्रीफांना बदनाम करण्यासाठी भाजपने ईडीच्या माध्यमातून रचलेले हे षड्यंत्र आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
महत्वाच्या इतर बातम्या