Dattatray Bharnne Jalna Rain: बांधावर पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, दत्तात्रय भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती, यंत्रणेची लाज काढली
Dattatray Bharnne Jalna Rain: शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठवू नयेत, सरकारी अधिकारी बांधावर येऊन पंचनामे करतील; कृषीमंत्री दत्ता भरणेंचं आवाहन. कर्ज वसुली थांबलीच पाहिजे.

Dattatray Bharnne Jalna Rain: राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यानंतर कृषी खात्याचा कारभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांना बुधवारी जालन्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बुधवारी जालन्यातली बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी गेवराई गावातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharnne) यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्हाधिकारी मॅडमने फळबागांचे पंचनामे करु नका, असे आदेश दिले आहेत. तुमची यंत्रणा शेतकऱ्यांना (Farmers) विचारतही नाही, असे या शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांनी पाण्यात भिजून कुजलेली पिकं (Crops loss Rain) कृषीमंत्र्यांना दाखवली आणि त्यांच्या हातातही दिली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दत्तात्रय भरणे यांना गावातून जवळपास काढता पाय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला सरकारने काय दिलं ,15 दिवस झाले पाणीच आहे, जनावरांना खायला काही नाही, असे एका तरुण शेतकऱ्याने सांगितले.
खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे प्रशासन करत नसल्याचे ऐकल्यानंतर कृषीमंत्री भरणे संतापले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून फैलावर घेतले. ज्याचं नुकसान झालं त्याच सगळं नुकसान घ्या, मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतो. शेतकऱ्याचा एक गुंठ्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहताल. शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे दत्तात्रय भरणे यांनी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले.
मी तुमच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीच इथे आलो आहे. मी एक-दोन ठिकाणी जात असलो तरी त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील यंत्रणा कामाला लागेल. सरकारी यंत्रणेकडून कोणी चुकलं असेल तर आता ते कामाला लागतील. तुमचा रोष असणं साहजिक आहे, कारण ज्याच जळतं त्याला कळतं. तुमची काय चूक नाही, तुम्ही व्यथा मांडताय तुमची. मात्र, तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, हे आश्वासन मी देतो. तसेच मेंढरं, गुरं वाहून गेली असतील आणि ज्या घरांची पडझड झाली असेल त्यासाठी नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले.
मी आज इथे आलो, म्हणजे तालुक्यातील यंत्रणा कामाला लागेल. राज्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याचे काम सुरु आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महसूल आणि कृषी विभाग काम करत आहे. त्यामुळे काळजी करु नका, तुम्हाला मदत करु. तुमची जमीन वाहून गेली असेल किंवा विहिरी बुजल्या असतील, अथवा घरांचे नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
आणखी वाचा
शेतकरी म्हणाले, दादा ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवार थांबवत म्हणाले, 'एक मिनिट...'
























