Girish Mahajan at Jalgaon : राज्यातील विविध विकासकामांना गती देणार : गिरीश महाजन
Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन आज प्रथमच जळगावमध्ये पोहोचले.भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर महाजन यांचं ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं.
Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये (Jalgaon) पोहोचले. यावेळी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर महाजन यांचं ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करत जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील विविध विकासकामांना गती देणार असल्याची ग्वाही भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली. सोबतच मंत्रिमंडळात डावलल्या गेलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाराज नसल्याचा दावा महाजन यांनी केला.
लवकरच खाते वाटप होणार
40 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. परंतु अद्याप खाते वाटप झालेलं नाही. त्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यावर गिरीश महाजन म्हणाले की, "लवकरच खाते वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही अपक्ष आमदारांमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी दिसून आली. परंतु लवकरच खाते वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.
ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही
पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंडे परिवार आणि त्यांच्याशी जवळच्या ओबीसींवर नेहमीच अन्याय केला जातो, अशी टीका खडसे यांनी केली. त्यावर रीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, "ओबीसींची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. ओबीसींना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर अन्याय झालेला नाही. पंकजा मुंडे यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नसून असेल तर पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी दूर करतील."
'क्लीन चिट मिळाल्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपद'
दरम्यान मंत्रिमंडळात संजय राठोड यांना जागा दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधक टीका करत आहेत. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. "पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे. तेच आता प्रश्न उपस्थित करत असून 'चीत भी हमारी पट भी हमारी. क्लीन चिट मिळाल्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. चित्रा वाघ यांची वैयक्तिक नाराजी आहे, ते आम्ही समजू शकतो," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
'एकनाथ खडसे यांनी शांतता ठेवावी'
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. दोघांनी 'तू तू मैं मैं' करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करावा, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. या टीकेलाही गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. "एकनाथ खडसे यांनी शांतता ठेवावी. आपणच 'तू तू मैं मैं' करु नका. आपल्या सरकारने मागे काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला जिल्ह्याचा विकास करु द्यावा, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.