राजगुरुनगरमध्ये मैत्रीचा विश्वासघात! मैत्रिणीनेच चोरले लाखोचे दागिने, व्हॉट्सअॅपमुळे फुटले बिंग!
Pune Crime : दागिन्यांची चोरी करणाऱ्या मैत्रिणीच्या बहिणीने ते दागिने व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला लावले आणि चोरीचे बिंग फुटले.

पुणे : राजगुरुनगर शहरात विश्वासघातकी मैत्रीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पडाळवाडी येथे रहाणाऱ्या दोन मैत्रिणींचा एकमेकींमधील विश्वासाच्या नात्यावर उभ्या असलेल्या मैत्रीचाच गैरफायदा घेतला गेला. एका महिलेने मैत्रिणीच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला.
पुनम आदक या महिलेच्या घरात सतत ये-जा करणारी शितल वायंदडे ही मैत्रीणच या चोरीमागे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अंगठ्या, टॉप्स, मंगळसूत्र, नेकलेस, कानातील झुंबे अशा विविध प्रकारचे मौल्यवान दागिने घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली.
व्हॉट्स्अप स्टेटसने बिंग फुटले
दरम्यानच्या काळात चोरीचा संशय असलेल्या शितल वायंदडेच्या बहिणीने चोरीचे दागिने हे तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर लावले होते. यावरून पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी शितल वायंदडेची अधिक चौकशी केली असता ही चोरी उघड झाली.
शितल वायंदडेवर चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. मात्र विश्वासघातकी मैत्रीची या चोरट्या कथेचा राजगुरुनगर परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
दागिने चोरट्याला अटक
दुसरीकडे मुंबईत स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पार्कसाईट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांनी गुजरातमधून ही अटक केली. तबरेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी तरबेज हा 7 जुलै रोजी त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क आणि हातात ग्लोज घालून आला. या वेळी घरात एकट्या असलेल्या नूरजहाँ यांच्या अंगावरील दागिने तो हिसकावू लागला. त्याचवेळी नूरजहाँ यांनी त्याला ओळखले. तुला हवे ते घे, पण मला मारू नको असे त्या त्याला सांगत होत्या. तशाही परिस्थिती आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
स्वतःच्या मावशीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपीने तिथून पळ काढला. आरोपी नंतर ट्रेनच्या माध्यमातून गुजरातमध्ये पोहोचला. पोलिसांनी 250 सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा गुजरातमध्ये माग काढला आणि त्याला अटक केली.
ही बातमी वाचा:























