जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये अनावरण
राष्ट्रध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन (अंदाजे) 1400 किलो आहे
![जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये अनावरण world largest national flag inaugrated in ladakh जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये अनावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/02/6e894ab8bed8c4b682cc74fc839fc367_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खादीच्या कपड्यापासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज आहे. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने हा स्मारकरुपी भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे. या राष्ट्रध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर.के.माथुर यांनी केले. या वेळी लष्कर प्रमुख एमएम नरवणे देखील या वेळी उपस्थित होते.
हा भव्य राष्ट्रध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन (अंदाजे) 1400 किलो आहे. खादीचे काम करणारे कारागीर आणि संबंधित कामगारांनी जवळजवळ 3500 तास काम करून हा भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे. एकूण 33,750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा विशाल ध्वज तयार करण्यासाठी 4600 मीटर इतक्या प्रचंड लांबीचे हाताने विणलेले खादीचे तागे वापरण्यात आले. या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा व्यास 30 फूट आहे. हा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागीर 49 दिवस काम करीत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशाच्या ‘स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी केव्हीआयसीने या प्रचंड ध्वजाची संकल्पना आखली आणि त्यानुसार हा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला. राष्ट्रध्वजाची हाताळणी तसेच प्रदर्शन अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने होणे आवश्यक असल्यामुळे केव्हीआयसीने हा राष्ट्रध्वज भारतीय लष्कराकडे सुपूर्द केला. या राष्ट्रध्वजाला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नये म्हणून लष्कराने चौकटीचा वापर केला आहे.
It is a moment of great pride for 🇮🇳 that on Gandhi ji's Jayanti, the world's largest Khadi Tiranga is unveiled in Leh, Ladakh.
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 2, 2021
I salute this gesture which commemorates Bapu's memory, promotes Indian artisans and also honours the nation.
Jai Hind, Jai Bharat! pic.twitter.com/cUQTmnujE9
या ध्वजाला चारही बाजूंनी नेफा जोडण्यात आला असून त्यासाठी 12 मिलीमीटरची दोरी वापरण्यात आली आहे. या ध्वजासाठी वरच्या आणि खालच्या बाजूला प्रत्येकी तीन तसेच डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी तीन अशा उच्च दर्जाच्या एकूण 12 नायलॉन दोऱ्या वापरण्यात आल्या असून त्यांनी सुमारे 3000 किलो वजन घेण्याच्या क्षमतेसह ध्वजाचे वजन विभागून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)