Weather Update : थंडीतही पावसाची रिमझिम, उत्तर भारतात हुडहुडी; IMD चा अंदाज काय सांगतो?
IMD Weather Forecast : देशात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेस दाट धुके राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
Weather Update Today : देशात कुठे थंडी तर कुठे पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, देशात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेस दाट धुके (Fogg) राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या भागात धुके पाहायला मिळेल.
'या' भागात पावसाची शक्यता
आयएमडीच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. आज तामिळनाडूच्या किनारपट्टी आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील वाऱ्यांमुळे 1 जानेवारीपर्यंत तमिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 डिसेंबरपासून वायव्य भारतावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे.
पार आणखी घसरण्याची शक्यता
आज आणि उद्या पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये पार आणखी घसरण्याची शक्यता आहे. आज राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्येही थंडी वाढणार असून दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत हवामान कायम राहण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 27 ते 28 डिसेंबर दरम्यान ओदिशा, उत्तराखंडमध्ये दाट धुक्याची शक्यता आहे. 29 आणि 30 डिसेंबरला चंदिगड, पंजाबमध्ये चंडीगडमध्ये दाट धुके कायम राहतील. 27 ते 30 डिसेंबर यादरम्यान आसाम आणि मेघालय तसेच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये दाट धुक्याची चादर दिसत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम
उत्तर भारतात दाट धुक्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. थंडीसोबतच मंगळवारी सकाळी दिल्लीमधील रस्त्यांवर दाट धुक्याची चादर पसरली होती. सकाळी यमुनेच्या काठावर धुक्याचा थर दिसत होता. रविवारी, दिल्ली आणि काश्मीरपासून दूर दक्षिणेकडील तेलंगणा आणि दक्षिण-पूर्वेकडील ओडिशापर्यंत 11 राज्यांमध्ये धुके पाहायला मिळालं. दृश्यमानतेत तीव्र घट झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर वाईट परिणाम झाला.