(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : हिमाचल-उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय' तर, पंजाब- हरियाणात 15 जणांचा पावसामुळे मृत्यू; IMD कडून सतर्कतेचा इशारा
Weather Update Today : उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे झालेल्या उध्वस्तानंतर हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे.
Weather Update Today : देशभरात पावसाने (Rain) यावेळी कहर केला आहे. हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विध्वंसानंतर मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले असून एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD नुसार, हिमाचल प्रदेश ते उत्तराखंडपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या राज्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये 15 जणांचा मृत्यू
पंजाब आणि हरियाणामध्ये तीन दिवसांपासून हाहाकार माजवल्यानंतर पाऊस किंचित थांबला आहे. मात्र, अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत. या ठिकाणी पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. पीटीआय एजन्सीच्या म्हणण्यानुसार, पावसाशी संबंधित घटनांमुळे मंगळवारी आणखी सहा मृत्यूंची नोंद झाली असून, गेल्या तीन दिवसांतील एकूण मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. पंजाबमध्ये आठ, तर हरियाणामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.
दिल्लीतही पूर परिस्थिती
राजधानी दिल्लीत मंगळवारी यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने 206 मीटरचा टप्पा ओलांडला. ज्यामुळे पूरग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून जुना रेल्वे पूल रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशातील परिस्थिती सारखीच
पीटीआय एजन्सीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 31 वर गेली आहे. सोमवारपर्यंत मृतांची संख्या 18 वर होती. मात्र, पावसाच्या जोरामुळे ही संख्या आता 31 वर गेली आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कसोल, मणिकरण, खीर गंगा आणि पुलगा भागाचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी सांगितले की, कुल्लूच्या सेंज भागात सुमारे 40 दुकाने आणि 30 घरे पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुल्लू येथील मदत शिबिरात लोकांशी संवाद साधला आणि त्यांना अन्न वाटप केले.
उत्तराखंडमध्ये, सोमवारी रात्री उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानी पुलाजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मध्य प्रदेशातील पाच यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले.