Weather Update : दिल्लीसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, थंडीचा कडाका वाढला
मंगळवारी रात्री दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्रात वगळता अन्य ठिकाणी थंडी कमी होत आहे.
Delhi-NCR Rains : देशात वातावरणात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी रात्री देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी दिवसभर उष्ण वातावरण दिसून आले, मात्र मध्यरात्री दिल्लीसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. कालच हवामान विभागाने दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, उत्तराखंडमध्ये बर्षवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्र वगळत अन्य ठिकाणी गारठा कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील नरेला, बवाना, हरियाणातील सोनीपत, खरखोडा, गुरुग्राम, जिंद, हिसार, सिवानी, गणौर, रोहतक, झज्जर, उत्तर प्रदेशातील बरौत, दौराला, बागपत, मेरठ, येथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार दिल्ली आणि आसपासाच्या परिसरात पाऊस झाला. दरम्यान, राजस्थानमधील पिलानी, भिवडी, तिजारा, खैरथल, कोतपुतली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आणि चंडीगढडमध्ये आणि लगतच्या भागात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, हरियाणा, राजस्थान, पंजाबमध्ये पावसाची स्थिती राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, उत्तर ओडिसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या जम्मू-काश्मीरच्या काही परिसरात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे श्रीनगरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात अद्याप उत्तर महाराष्ट्रात चांगला गारठा असल्याचे दिसत आहे. अन्य भागात हळूहळू थंडीची लाट ओसरत आहे. तापमानात देखील वाढ होत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलन, गस्तीला गेलेल्या सात जवानांचा मृत्यू
- UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या 58 जागांसाठी होणार मतदान
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप