Weather Update : महाराष्ट्रात पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचा चटका, तर 'या' राज्यात आज पावसाचा अंदाज, शाळांना सुट्टी
Weather Update News : देशातील काही भागात गारठा (Cold Weather) वाढला आहे, तर काही ठिकाणी पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे.
Weather Update News : देशात सातत्यानं हवामानात (Weather) बदल होत आहे. हवामानात सध्या चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील काही भागात गारठा (Cold Weather) वाढला आहे, तर काही ठिकाणी पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडं महाराष्ट्रात (Maharashtra) देखील गारठा वाढला आहे. राज्यात पहाटे हुडहुडी तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, आज हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार काही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
'या' राज्यात आज पावसाचा अंदाज
दिल्लीत तापमानात किंचित घट नोंदवली जात असतानाच दुसरीकडे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर काही डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागासह तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे तामिळनाडूतील अनेक भागातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय रायलसीमा आणि केरळमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गारठा वाढला
राज्याच्या अनेक भागात तापमानात घट झाली आहे. पहाटे जोराची थंडी वाजत आहे तर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. पहाटे काही ठिकाणी दव धुके पडत आहे. राज्याचे किमान तापमान 11 ते 22 अंशाच्या दरम्यान आहे, तर कमाल तापमान हे 31 ते 35 अंशाच्या आसपास आहे.
दिल्लीत हवामान कसे असेल?
देशाची राजधानी दिल्लीत आज 11 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 16 अंश आणि कमाल तापमान 29 अंश राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यासोबतच सकाळी धुकेही पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज किमान तापमान 18 अंश तर कमाल तापमान 30 अंश राहील. त्याचबरोबर सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये किमान तापमान 15 अंश आणि कमाल तापमान 29 अंश राहील. गाझियाबादमध्येही धुके असेल.
महत्त्वाच्या बातम्या: