Vijay Diwas 2022: अर्ध्या तासात शरण या अन्यथा... भारताचा पाकिस्तानला आदेश; आत्मसमर्पण करावं लागल्याने पाकिस्तानी जनरलचे डोळे पाणावले
Vijay Diwas 2022: पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेशला मुक्त केल्याच्या घटनेला आणि भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाला आज 52 वर्षे पूर्ण झाली. आजचा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
नवी दिल्ली: पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश हा पाकिस्तानच्या जाचातून मुक्त करण्यासाठी बांग्ला मुक्तीवाहिनीचा (Bangladesh Mukti Bahini)पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष सुरु होता. या मुक्ती वाहिनीला युध्दाचं प्रशिक्षण भारतात देण्यात आलं होतं हे आतापर्यंत उघड झालेलं. तरीही भारतीय लष्कर हे सुरुवातीला या युद्धाचा भाग नव्हतं. परंतु पाकिस्तानच्या सैन्यानं भारताविरोधात 'ऑपरेशन चंगेज खान' सुरु केलं आणि भारताच्या पश्चिम सीमेवर हल्ला केला. त्यावेळी भारतानं या युद्धात केवळ भागच घेतला नाही तर केवळ 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971. हाच दिवस भारतात 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो.
भारतीय लष्कराने ढाक्याला वेढा घातला आणि त्यात पाकिस्तानचे जवळपास 93 हजार सैन्य मृत्यूच्या तावडीत सापडले. त्यावेळी पाकिस्तानच्या जनरल नियाजी यांना भारतासमोर आत्मसमर्पण केल्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता. केवळ 3000 भारतीय सैन्याने ही कमाल केली होती. भारतीय लष्करप्रमुख मॉनेक शॉ यांनी 16 डिसेंबरच्या पहाटे जनरल जेएफआर जेकब यांना फोन केला आणि ढाक्याला जायला सांगितलं. त्यांना पाकिस्तानचे आत्मसमर्पण स्वीकारायचे होते
जनरल जेएफआर जेकब ज्यावेळी ढाक्याला पोहचले त्यावेळी त्यांना गोळ्यांचा आवाज येत होता. अजूनही युद्ध सुरु होतं. त्यांची पाकिस्तानच्या जनरल नियाजींशी भेट झाली तेव्हा जनरल जेकब यांनी त्यांना आत्मसमर्पणाचा दस्तऐवज वाचून दाखवला. त्यावर जनरल नियाजी भडकले आणि म्हणाले, "कोण म्हणतंय आम्ही आत्मसमर्पण करतोय. केवळ सीजफायर करण्याची चर्चा झाली होती."
1971 India Pakistan War: पाकिस्तानचं आत्मसमर्पण आणि जनरल नियाजींच्या डोळ्यात पाणी
पाकिस्तानी जनरल नियाजी यांच्या या वक्तव्यानंतर जनरल जेकब यांनी नियाजींना सुनावलं. त्यांनी सांगितलं की, "पाकिस्तानने आत्मसमर्पणाच्या पत्रावर सह्या केल्या तरच पाकिस्तानचे सैनिक आणि त्यांच्या परिवारांच्या संरक्षणाची हमी घेतली जाईल. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा." या गोष्टीला जनरल नियाजी तयार नव्हते. जनरल जेकब यांनी त्यांना आत्मसमर्पणासाठी अर्ध्या तासांचा वेळ दिला. अर्ध्या तासानंतर जनरल जेकब यांनी नियाजींना तीन वेळा विचारलं की ते आत्मसमर्पणाला तयार आहेत का नाही. त्यावर जनरल नियाजींनी कोणतंही उत्तर दिलं नाही. शेवटी जनरल जेकब यांनी नियाजींची आत्मसमर्पणाला मूकसंमती आहे असं समजून ढाकाच्या रेसकोर्स मैदानावर आत्मसमर्पणासाठी दोन खुर्च्या लावल्या.
तोपर्यंत भारताचे मेजर जनरल जगजीत सिंह अरोरा हे देखील ढाक्यात पोहचले होते. त्यांच्या समोरच पाकिस्तानच्या लष्कराचे जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांना आपल्या 93,000 सैनिकांसोबत शेवटी भारतासमोर आत्मसमर्पण करायला लागलं. आत्मसमर्पणाच्या वेळी जनरल नियाजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
नंतर या भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या शिमला करारांतर्गत पाकिस्तानी बंदी सैन्यांना भारतीय लष्कराने सोडून दिलं. भारताने हे युद्ध केवळ 14 दिवसातच जिंकलं होतं आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं.