Coronavirus in India : 4 मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद; जो बायडेन सरकारचा निर्णय
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी (Jen Psaki) यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोग नियंत्रण आणि आटोक्यात आणण्यासाठीच्या यंत्रणांच्या सल्ल्यानुसार प्रशासनाकडून भारतातून होणाऱ्या प्रवासावर बंदी आणण्यात येत आहे.
नवी दिल्ली: भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. देशभरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत आहे. तर दिवसाला हजारोच्या संख्येने कोरोनोबाधितांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 4 मेपासून भारतीयांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी (Jen Psaki) यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “रोग नियंत्रण आणि आटोक्यात आणण्यासाठीच्या यंत्रणांच्या सल्ल्यानुसार प्रशासनाकडून भारतातून होणाऱ्या प्रवासावर बंदी आणण्यात येत आहे. भारतातील कोविड 19 चा वाढता प्रसार आणि कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या प्रसारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.”
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देशांनी आणि मोठ्या कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह जगातील सुमारे 40 देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यापैकी अनेक देशांनी वैद्यकीय मदत पाठवली आहे.
कोरोना संकटात अमेरिकेकडून भारताला मदतीचा हात
दरम्यान, अमेरिकेतून कोरोनासंबंधीत मदत साहित्य भारतात पोहोचलं आहे. अमेरिकेतून पाठविण्यात आलेले शेकडो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि रेगुलेटरसह आपत्कालीन औषध आणि इतर वैद्यकीय सामुग्री घेऊन दोन विमाने शुक्रवारी भारतात दाखल झाली आहे. अमेरिकन हवाई दलातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक सी -5 एम हे विमान सुपर गॅलेक्सी वैद्यकीय उपकरणे आणि इतर वैद्यकीय सामुग्री घेऊन दिल्लीला पोहोचलं.
अमेरिकेच्या दूतावासाने ट्विट केले आहे की, “कोविड 19 च्या आणीबाणीच्या काळात अमेरिकेतून वैद्यकीय मदतीची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. 70 वर्षांहून अधिक काळच्या सहकार्याला आणखीन मजबूत केले आहे. अमेरिका भारताच्या पाठीशी उभा आहे. आपण एकत्र कोविड 19 विरुद्धची लढाई लढू."
The first of several emergency COVID-19 relief shipments from the United States has arrived in India! Building on over 70 years of cooperation, the United States stands with India as we fight the COVID-19 pandemic together. #USIndiaDosti pic.twitter.com/OpHn8ZMXrJ
— U.S. Embassy India (@USAndIndia) April 30, 2021
त्याशिवाय अमेरिकेहून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे आणइ इतर साहित्य असलेले दुसरं विमान सी -17 ग्लोबमास्टरही शुक्रवारी रात्री भारतात पोहोचले.
Covid-19 Second Wave | कोरोना संकटात भारताला 40 हून अधिक देशांकडून मदतीचा हात