Covid-19 Second Wave | कोरोना संकटात भारताला 40 हून अधिक देशांकडून मदतीचा हात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील 40 हून अधिक देश पुढे आले आहेत. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून 550 ऑक्सिजन जनेरेटिंग प्लांट, 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 10 हजार 000 ऑक्सिजन सिलेंडर आणि 17 क्रायोजेनिक टँकर मिळतील, असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देशांनी आणि मोठ्या कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह जगातील सुमारे 40 देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यापैकी अनेक देशांनी वैद्यकीय मदत पाठवली आहे. सिंगापूरहून ऑक्सिजन कंटेनरसह इतर वैद्यकीय उपकरणे काही दिवसांपूर्वी भारतात दाखल झाली आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी गुरुवारी (29 एप्रिल) याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून 550 ऑक्सिजन जनेरेटिंग प्लांट, 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 10 हजार 000 ऑक्सिजन सिलेंडर आणि 17 क्रायोजेनिक टँकर मिळतील, असं शृंगला यांनी सांगितलं.
जगभरातून भारताला मदतीचा हात
परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "अमेरिकेहून येत्या काही दिवसात तीन विशेष विमानं भारतात पोहोचण्याची आशा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली आणि मदतीचं आश्वासन दिलं. संयुक्त अरब अमिरातहून व्हेंटिलेटर आणि फॅविपिरावीर औषधांची खेप येणार आहे. मदतीची हात पुढे करणाऱ्या या 40 देशांमध्ये केवळ विकसित देशांनी नाही तर मॉरिशस, बांगलादेश आणि भूटान या आपल्या शेजारच्या छोट्या देशांनीही मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे."
"आपण मदत केली, आपल्याला मदत मिळत आहे, असं हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटलं. सध्या नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. आयर्लंडहून 700 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह एक विमान येणार आहे. तर शनिवारी फ्रान्सहून वैद्यकीय उपकरणाची एक खेफ येणार आहे. रेमडेसिवीरच्या निर्मितीसाठी आम्ही इजिप्तच्या संपर्कात आहोत, जेणेकरुन आम्ही तिथून आयात करु शकतो," असं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
मोठ्या कंपन्यांकडूनही मदत
केवळ देशच नाही तर अनेक मोठ्या कंपन्याही या संकटात भारताच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कोरोना संकटात भारताच्या मदत करणार असल्याचं सांगितलं. अमेरिकेची टेक कंपनी गुगलने कोरोनाशी लढण्यासाठी भारताला 135 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. हा निधी GiveIndia आणि UNICEF ला दिला जाईल, ज्याचा वापर भारतात वैद्यकीय उपकरणे आणि कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी केला जाईल.
याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही भारतात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन डिवाईस खरेदी करण्यासाठी मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांमध्ये चर्चा
भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील अनेक राज्यात मेडिकल ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. याचदरम्यान भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोरोना संकटात मदतीसाठी सैन्याकडून केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांवर त्यांच्यात चर्चा झाली.