Rain Update : उत्तर भारताला पुराचा मोठा फटका, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट; हिमाचल प्रदेशला 180 कोटी रुपयांची मदत जाहीर
Rain Update: उत्तर भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
Rain Update: सध्या उत्तर भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. दिल्लीतही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, दिल्लीत काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळं यमुना नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. दिल्लीत रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, उत्तर भारतात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पूरग्रस्त हिमाचल प्रदेशसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधील 180.40 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यामुळं राज्य सरकारला पावसाळ्यात बाधित लोकांसाठी मदत आणि उपाययोजना करण्यात मदत होणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी
उत्तर प्रदेशातही पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याच्या विविध भागात सतत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, IMD ने शनिवारी राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर 50 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे उत्तर प्रदेशातील नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढू लागली आहे.
उत्तराखंडमध्ये आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
उत्तराखंडमधील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीआहे. 17 जुलैला हरेला सणाची सुट्टी असून १६ जुलैला रविवार असल्याने शाळा बंद राहणार आहेत. अशाप्रकारे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सलग चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील 18 राज्यांना पुराचा फटका
देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून मोठं नुकसान झालं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत साडे पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळं अनेक भागात भूस्खलन झालं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: