Delhi Flood : आज दिल्लीत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, यमुनेची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; रविवारपर्यंत शाळा महाविद्यालये बंद
उत्तर भारतात पावसानं (Rain) कहर केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत.
Delhi Flood : सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) कहर केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लातही (Delhi) अशीचं स्थिती आहे. दिल्लीत पावसामुळे यमुना नदीच्या (Yamuna River) पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. तब्बल 45 वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने 208 मीटरचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या दिल्लीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यमुना नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता
दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुार, दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे. ती आज रात्रीपासून कमी होण्यास सुरुवात होईल. CWC च्या फ्लड मॉनिटरिंग पोर्टलनुसार, जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी दुपारी 1 वाजता 208.62 मीटरपर्यंत वाढली, जी दुपारी 4 वाजेपर्यंत स्थिर होती. आजपासून यमुना नदीची पाणी पातळी खाली येणे अपेक्षित आहे. दिल्लीत यमुना नदीला उधाण आल्यानंतर अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. नदीजवळ राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये रविवारपर्यंत बंद
दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये रविवारपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्राधिकरणाने शहरातील खासगी आस्थापनांना घरुन काम करण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीत गेल्या चार दिवसांत यमुनेच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता 203.14 मीटरवरुन सोमवारी संध्याकाळी 5 वाजता यमुना नदीची पाणी पातळी 205.4 मीटरपर्यंत वाढली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौऱ्यातून अमित शाहंना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील पूरस्थितीबद्दल चर्चा केली. अमित शाहा यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. यमुना नदीची पाणी पातळी कमी होण्याचा अंदाज असल्याचे अमित शाह यांनी पंतप्रधानांना सांगितले. तसेच परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचेही शाह म्हणाले.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात 'मुसळधार पाऊस' होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Delhi Yamuna Flood : दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क