Corona Vaccine : गुणवत्तेशी तडजोड नको, रॅन्डमली क्लिनिकल ट्रायल व्हायला हवं: डॉ. संजय राय
परदेशी लसींच्या थेट वापराला परवानगी देण्यापेक्षा गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांचे रॅन्डमली क्लिनिकल ट्रायल व्हायला हवं असं मत एम्सचे डॉ. संजय राय यांनी व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परदेशी लसींच्या भारतात कोणत्याही चाचण्या होणार नाहीत किंवा त्यांचे ट्रायल केलं जाणार नाहीत. याचा फायदा फायझर आणि मॉडर्ना या लसींना मिळण्याची शक्यता आहे. या मागे काही फार्मा कंपन्यांचे षडयंत्र आहे की किंवा परदेशी कंपन्यांना एवढ्या सवलती देण्याची गरज आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परदेशी लसींच्या थेट वापराला परवानगी देण्यापेक्षा गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांचे रॅन्डमली क्लिनिकल ट्रायल व्हायला हवं असं मत एम्सचे डॉ. संजय राय यांनी व्यक्त केलंय.
परदेशी लसींचा थेट वापर, केंद्र सरकारचा निर्णय
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असताना लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. त्यावर मात करण्यासाठी आता सरकारने परदेशात वापरात असलेल्या लसींना थेट मंजुरी देण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे परदेशी लसींचा आता कोणत्याही मंजुरीविना थेट वापर करता येऊ शकेल. या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे अशा पद्धतीची मागणी केली होती.
क्लिनिकल ट्रायल व्हायला हवं पण...
आशियाई देशांशी तुलना करता युरोप आणि इतर खंडामध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकच लस सर्व ठिकाणी तितकीच प्रभावी ठरेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत परदेशी कंपन्यांच्या चाचण्या व्हायला हव्यात अशी सरकारची भूमिका या आधी होती. पण देशातील सध्याची आपत्कालीन स्थिती लक्षात घेता भारत सरकारने या लसींच्या थेट वापराला मंजुरी दिली आहे असं डॉ. संजय यांनी स्पष्ट केलं.
रॅन्डमली क्लिनिकल ट्रायल व्हायला हवं
डॉ. संजय राय म्हणाले की, "एप्रिल महिन्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेता सरकारने क्लिनिकल ट्रायल ऐवजी ब्रिज क्लिनिकल ट्रायल घेण्याचा निर्णय घेतला. पण यातही आपण क्लिनिकल ट्रायल पूर्णपणे न टाळता रॅन्डम पद्धतीने ट्रायल घेतल्या पाहिजेत. त्यामुळे कंपन्यांकडून त्या लसीची गुणवत्ता राखली जाईल. त्यांच्यावर लसीची गुणवत्ता राखण्याचा दबाब निर्माण होईल. आपण लसीच्या गुणवत्तेशी तडजोड करु नये. त्यामुळे त्यांना पूर्णपणे सवलत न देता काही अटी लादल्या पाहिजेत. दुष्परिणाम नको हे औषधाचं मूलभूत तत्व आहे. जर त्या औषधांपासून काही फायदा झाला नाही तर त्यापासून काही तोटाही होऊ नये याची खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे असं डॉ. संजय राय म्हणाले.
संबंधित बातम्या :