कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक? AIIMS चे प्रमुख डॉक्टर म्हणतात..
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर एम्समधील लस चाचणीचे प्रमुख इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : देश सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेशी लढतोय. हळूहळू संसर्गाचा वेग कमी होत आहे. मात्र, तरीही धोका कायम आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून अशी चर्चा आहे की देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. या लाटेत लहान मुलं जास्त बाधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत एबीपी न्यूजशी बोलताना एम्समधील लस चाचणीचे प्रमुख इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुलांना धोका असण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही : डॉ. राय
डॉ. संजय राय म्हणतात की आतापर्यंत असा कोणताही वैज्ञानिक आधार मिळालेला नाही ज्याद्वारे म्हणता येईल की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना सर्वाधिक त्रास होईल. ते म्हणाले की, देशात आतापर्यंत झालेल्या अनेक सीरो सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. डॉ. राय म्हणाले की, कोणत्याही साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात. मात्र, याचा परिणाम एका विशिष्ट वयाच्या लोकांनावर होतो, यात तथ्य नाही. तिसऱ्या लाटेत मुलांना धोका असल्याच्या बातम्या ऐकून पालक चिंतेत आहेत. मात्र, त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ संजय राय यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी : डॉ. प्रदीप आवटे
राज्यातील आकडेवारी काय सांगते?
कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
- नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे - शून्य ते पाच 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.4 टक्के, बारा ते सतरा 4.1 टक्के, एकूण 7.8 टक्के.
- नोव्हेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.1 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.5 टक्के, एकूण 6.9 टक्के)
- डिसेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.9 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.3 टक्के, एकूण 6.3 टक्के)
- जानेवारी 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.7 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.2 टक्के, एकूण 6.0 टक्के)
- फेब्रुवारी 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.18 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.00 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.08 टक्के, एकूण 7.26 टक्के)
- मार्च 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.64 टक्के, एकूण 6.78 टक्के)
- एप्रिल 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.34 टक्के, एकूण 8.38 टक्के)
या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.