पंजाब सरकारनं करून दाखवलं, महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचे परिपत्रक जारी
Punjab Government : महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचं परिपत्रक आज पंजाब सरकारने जारी केले आहे. त्यामुळं दिल्लीनंतर आता पंजाबच्या जनतेला देखील 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
Punjab Government : विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द आम आदमी पक्षाने खरा करून दाखवला आहे. महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचं परिपत्रक आज पंजाब सरकारने जारी केले आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष दिल्लीनंतर आता पंजाबच्या जनतेला देखील 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाने पंजाबच्या जनतेला मोफत वीज देण्याचा शब्द दिला होता. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले तर 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येईल, असे आश्वासन आपकडून देण्यात आले होते. पंजाबच्या जनतेने आपवर विश्वास ठेवला आणि राज्यात आपचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर आपने निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांमधील अनेक निर्णय घेतले. मोफत वीज देण्याचा देखील निर्णय आपने आज घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक आज मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जारी केले आहे.
पंजाबमधील लोकांना दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. यामध्ये एका बिलात 600 युनिट वीज मोफत देण्याची तरतूद आहे. पंजाबमध्ये दर दोन महिन्यांनी एकदा वीज बील येते. त्यानुसार एका बीलात 600 युनिट वीज मोफतदेण्यात येणार आहे. परंतु, 600 पेक्षा जास्त युनिट खर्च झाल्यास सर्व युनिटची किंमत ग्राहकांना मोजावी लागणार आहे.
अनुसूचित जाती, बीसी, स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांना यापूर्वी 200 युनिट मोफत विजेचा लाभ मिळत होता त्यांनाही मोफत विजेचा लाभ मिळणार आहे. आता त्यांना 300 युनिट वीज आणि एका बिलात 600 युनिट वीज मोफत मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र फॉर्म जारी करण्यात आला आहे. हा फॉर्म या वर्गातील लोकांना भरावा लागणार आहे.
राजकीय नेत्यांना लाभ नाही
दरम्यान, पंजाब सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात राजकीय लोकांना मोफत विजेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच सरकारी नोकरी करणाऱ्यांपैकी चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.