(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीन वर्षापूर्वी 'ती' रात्र जागून काढली होती, मोदींनी जागवली सर्जिकल स्ट्राईकची आठवण
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर 28-29 सप्टेंबर 2016 दरम्यानच्या रात्री भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर हल्ला केला होता.
नवी दिल्ली : अमेरिका दौरा पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी भारतात परतले. नवी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी सर्जिकल स्ट्राईकची आठवण करुन दिली.
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला. तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मी संपूर्ण रात्र जागा होतो. प्रत्येक सेकंदाला माझं फोनकडे लक्ष होतं. कधी एकदा फोनची घंटी वाजेल यांची वाट मी पाहत बसलो होतो. त्यादिवशी भारतीय जवानांनी देशाची आन-बान आणि शान राखली आणि आपली ताकद जगाला दाखवून दिली, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी जागवल्या.
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना धडा शिकवला होता. 28-29 सप्टेंबर 2016 दरम्यानच्या रात्री भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी दहशतवादी कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी अमेरिकेतील भारतीयांचेही आभार मानले. ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील भारतीयांनी हजेरी लावली होती. त्यानंतर नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघातही भाषण केलं. "2014 नंतर पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मी संयुक्त राष्ट्रात गेलो होतो, त्यानंतर आता गेलो. या पाच वर्षात अनेक मोठे बदल झाले. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारताबाबत आदर देखील वाढला आहे", असं मोदींनी म्हटलं.