राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅबिनेटचा दर्जा
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे बक्षिस मिळालं आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सल्लागार पदी असलेल्या अजित डोभाल यांना कॅबिनेटचा दर्जा दिला आहे.
पुढील पाच वर्षांसाठी अजित डोवाल यांना हा दर्जा मिळाला आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्त केलं होतं. आजवर राष्ट्रीय सल्लागार पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होता.
अजित डोवाल यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानमुळे मोदी सरकारने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं श्रेय डोवाल यांना दिलं जातं.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचारादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यावर जास्त भर दिला होता. याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला आहे आणि 303 जागांवर भाजपने विजय मिळवला. राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे बक्षिस मिळालं आहे.
कोण आहेत अजित डोवाल?
- अजित डोवाल निवृत्त आयपीएस अधिकारी असून ते सध्या भारताचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. - 31 मे 2014 पासून ते देशाचे राष्ट्रीय सल्लागार असून ते पाचवे देशाचे राष्ट्रीय सल्लागार आहेत. - अजित डोवाल 1968 च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना चार वर्षांनी 1972 मध्ये ते आयबीमध्ये रुजू झाले. - गुप्तचर विभागात असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 7 वर्षे ते मुस्लीम बनून राहिले होते. - अजित डोवाल एकमेव पोलीस अधिकारी आहेत की ज्यांना किर्तीचक्र आणि शांतीकाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.