मान्सूनचं आगमन लांबलं! केरळमध्ये मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज
केरळमध्ये यंदा मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
नवी दिल्ली - दरवर्षीप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचं 1 जूनला होणारं आगमन यंदा लांबलं आहे. आता दोन दिवस उशीरा म्हणजे 3 जूनला केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह 1 जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
पावसाचे उद्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर आगमन होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी हे आपल्या ताज्या अंदाजात सांगितले. केरळच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने आपल्या ताज्या अंदाजानुसार व्यक्त केली आहे. जवळपास निम्म्या शेतजमिनीत सिंचन नाही आणि तांदूळ, कॉर्न, ऊस, कापूस आणि सोयाबीनची पिके घेण्यासाठी जून ते सप्टेंबरच्या वार्षिक पावसावर अवलंबून असतो. या पिकांसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे ठरते.
केरळमध्ये मान्सुन ३ जूनला दाखल होण्याची शक्यता
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2021
Latest meteorological conditions, south-westerly winds could strengthen further gradually frm 1st June,resulting in likely enhancement in RF activity ovr Kerala.Hence monsoon onset over Kerala is likely to take place by 03June
- IMD pic.twitter.com/HE52Sn1Kbk
महाराष्ट्रातही मान्सून लांबणार
केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशीरा मान्सूनचं आगमन होणार आहे. कोकणात मान्सून 10 जूनला दाखल होईन तर मुंबईत 12 पर्यंत पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस
राज्यात शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पुणे, अहमदनगर, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात काल मान्सूनने हजेरी लावली. अवकाळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून भुईमूग काढणीला आल्याने शेतकरीही चिंतेत आहे.