एक्स्प्लोर
Advertisement
DETAIL : विरोधक नापास, मोदी सरकारवरच 'विश्वास'
अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी लोकसभा सभागृहात 451 सदस्य हजर होते. त्यापैकी 325 सदस्यांनी मोदी सरकारवर विश्वास दाखवला, तर 126 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत नोंदवलं. त्यामुळे टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला.
नवी दिल्ली : टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटळाला असून, विश्वासमत ठराव मोदी सरकार जिंकलं आहे. तब्बल 12 तास सलग लोकसभेचं कामकाज चालल्यानंतर मतदान घेण्यात आले. मात्र मोठ्या फरकाने मोदी सरकार विश्वासमत जिंकलं आहे.
मतदानासाठी लोकसभा सभागृहात 451 सदस्य हजर होते. त्यापैकी 325 सदस्यांनी मोदी सरकारवर विश्वास दाखवला, तर 126 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मत नोंदवलं. त्यामुळे टीडीपीने मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला.
मात्र दिवसभरात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेलं शाब्दिक युद्ध, टीडीपी खासदार जयदेव गल्ला यांचं आक्रमक आणि मुद्देसूद भाषण, तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली गळाभेट आणि त्यावर मोदींनी चढवलेल्या हमला इत्यादी गोष्टी चर्चेत राहिल्या.
टीडीपी खासदार जयदेव गल्लांनी मांडला अविश्वास प्रस्ताव
टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जात नाही, तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.
अविश्वास प्रस्ताव मांडताना जयदेव गल्ला काय म्हणाले?
"या देशात पुतळ्यांसाठी जास्त पैसे मिळतात, मात्र विकास कामांना पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्रात छत्रपती शिवराय आणि गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांना जेवढा पैसा मिळाला, त्यापेक्षा कमी पैसा आंध्र प्रदेशला विकासासाठी मिळाला.", असे जयदेव गल्ला म्हणाले.
तसेच, “आंध्र प्रदेशची स्थिती बुंदेलखंडहून वाईट आहे. बुंदेलखंडचं दरडोई उत्पन्न 4 हजार रुपये आहे, तर आंध्र प्रदेशचं दरडोई उत्पन्न 400 रुपये आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेशबाबत भेदभाव करत असून, काँग्रेसची जशी स्थिती झाली, तशी भाजपची होईल. ही मोदी सरकारला धमकी नसून, शाप आहे.” असे म्हणत जयदेव गल्ला यांनी जोरदार निशणा साधला.
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
"तुमच्या मनात माझ्याविषयी राग आहे, द्वेष आहे, तुमच्यासाठी मी पप्पू आहे, पण माझ्या मनात तुमच्याविषयी जरासाही राग नाही," असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. एवढ्यावरच राहुल गांधी थांबले नाहीत तर आपल्या जागेवरुन उठून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेले आणि त्यांची गळाभेट घेतली.
"भाजप आणि आरएसएसचा मी आभारी आहे, त्यांच्यामुळे मला काँग्रेसचा अर्थ कळला. त्यांनी मला हिंदुस्तानी काय असतं हे शिकवलं. हिंदू असल्याचा अर्थ समजावला. तुमच्या मनात माझ्यासाठी तिरस्कार आहे, तुमच्यासाठी मी पप्पू असेन. तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असे राहुल गांधी म्हणाले.
मोदींची गळाभेट आणि मोदींकडून पाठीवर थाप
आपलं भाषण संपल्यानंतर राहुल गांधी जागेवरुन उठले आणि मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी हसत राहुल गांधींशी हस्तांदोन केलं आणि त्यांच्या पाठीवर थाप मारली. मग आपल्या जागेवर येत, ही आहे 'हिंदू संस्कृती' असं म्हणत राहुल गांधींनी भाषण संपवलं. पण भाषणानंतर घडलेल्या या प्रकाराने सभागृहातील सगळेच जण थक्क झाले.
शिवसेना तटस्थ
केंद्र सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. यावेळी एनडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तटस्थ राहत सभागृहात उपस्थित राहणं टाळलं. मात्र शिवसेनेच्या लेटरहेडवर एक व्हिप जारी झाला होता. खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा आपला व्हिप नसून कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचं म्हटलं. काल शिवसेनेच्या लेटरहेडवर असा व्हिप जारी झाला होता आणि हा व्हिप सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
आम्ही गदा उपसली : शिवसेना
‘आम्ही गदा उपसलेली आहे आणि ती गदा वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात पडलेली आहे, यापुढेही पडेल,’ असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट केली.
‘पक्षाने कोणताही व्हिप काढला नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी दिलेल्या आदेशानुसारच आमचे सर्व खासदार आज सभागृहात अनुपस्थित राहिले,’ असं म्हणत राऊत यांनी व्हिपच्या चर्चांना उत्तर दिलं. अविश्वास प्रस्तावाबाबत आमची भूमिका स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोणतीही चूक केलेली नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.
राहुल गांधींच्या ‘जादू की झप्पी’वर विनोदांचा पाऊस
संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. राहुल यांच्या या कृतीने सर्वजण अचंबित झाले. सोशल मीडिया यूजर्सना तर आपली क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी आणखी एक विषय मिळाला आणि विनोदांचा पाऊस सुरु झाला.
कामांचा पाढा वाचत मोदींचा काँग्रेसवर पलटवार
"मांझी ना रहबर ना हकमे हवांए...हे कश्ती भी जर जर ये कैसा सफर...", अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावरील भाषणा दरम्यान काँग्रेस आणि मोदी विरोधात जमा झालेल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या प्रत्येक मुद्द्याला जोरदार प्रत्युत्तर देत, राहुल यांचे सर्व आरोप खोडून काढले.
सर्जिकल स्ट्राईक, राफेल विमान, रोजगार, शेती संदर्भातील योजना अशा अनेक मुद्द्यांवर मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला. आजकाल शिवभक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. मी भगवान शंकरला प्रार्थना करतो की 2024 मध्ये तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव घेऊन याल, असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला. यावेळी मोदींनी सोनिया गांधी यांच्या कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही, या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला.
...आणि मोदी सरकार विश्वासमत जिंकलं!
तब्बल 11 तास चाललेली लोकसभा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेलं शाब्दिक युद्ध, राहुल यांनी मोदींची घेतलेली गळाभेट आणि त्यावर मोदींनी चढवलेल्या हमला, हे सर्व पार पडल्यानंतर विरोधकांनी सादर केलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मोठ्या फरकानं सभागृहानं फेटाळला आहे.
पंतप्रधान मोदी यांचं भाषण पार पडल्यानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडलं. यावेळी एकूण 451 खासदारांनी मतदान केलं. त्यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 126 मतं पडली, तर 325 मतं अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात पडली. त्यामुळे 119 मतांनी भाजप विजयी ठरली आहे. तर 84 खासदार गैरहजर राहिले. यात रालोआतील भाजपचा सर्वात मोठा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचाही समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
राजकारण
भारत
Advertisement