Monsoon News : मान्सून येतोय... आज केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने वर्तवलल्या अंदाजानुसार आज केरळमध्ये मान्सून (Monsoon) दाखल होण्याचा अंदाज आहे.
Monsoon News : सर्वांसाठीच एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. मान्सून (Monsoon ) आज (27 मे) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रीय झाला आहे. तसचं दक्षिण आणि इशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरु राहिला तर पुढील आठवडाभरात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
दरम्यान, एकीकडं मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरु झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला कोकणात मान्सून दाखल होईल, त्यानंतर इतर महाराष्ट्रात आगमन होईल. दरम्यान, राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे.
महत्वाच्या बातम्या: