Asia cup 2018 : बलाढ्य भारताचा दुबळ्या हाँगकाँगची सामना
रोहित शर्माच्या टीम इंडियाचा आशिया चषकातला सलामीचा सामना आज हाँगकाँगशी होणार आहे. हाँगकाँगला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून आठ विकेट्सनी हार स्वीकारावी लागली.
दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियाचा आशिया चषकातला सलामीचा सामना आज हाँगकाँगशी होणार आहे. टीम इंडियाच्या तुलनेत हाँगकाँग हा अतिशय दुबळा संघ आहे. याच हाँगकाँगला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून आठ विकेट्सनी हार स्वीकारावी लागली.
त्यामुळे भारतीय संघासमोरही हाँगकाँगचा फारसा निभाव लागणार नाही, असा अंदाज आहे. तरीही टीम इंडियाच्या दृष्टीनं या सामन्याला वेगळं महत्त्व आहे. आशिया चषकात भारताचा दुसरा साखळी सामना बलाढ्य पाकिस्तानशी आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत वाढलेल्या जबाबदारीचा ताण रोहितवर येऊ नये म्हणून धोनी प्रयत्न करत आहे. भारतीय संघाच्या नेट्समध्ये प्रत्येक फलंदाजावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला सूचना करण्याची जबाबदारी धोनीनं स्वीकारली आहे.
पाकिस्तानशी खेळण्याआधी टीम इंडियाला हाँगकाँगविरुद्ध आपली ताकद अजमावून घेण्याची संधी मिळेल. दुबईतल्या 43 अंश सेल्सियस तापमानात दोन्ही संघांमधील खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी पाहिली जाईल.
हाँगकाँग संघाचं वैशिष्ट्य हाँगकाँगनं पात्रता फेरीत खेळून, आशिया चषकाच्या मुख्य स्पर्धेत धडक मारली आहे. हाँगकाँग संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आठ शिलेदार हे मूळ पाकिस्तानी वंशाचे आहेत. पण त्यांचा कर्णधार अंशुमन रथ हा मूळ भारतीय वंशाचा आहे. अंशुमन हा सौरव गांगुली आणि कुमार संगकाराचा चाहता असून, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी त्याचा पाठिंबा हा टीम इंडियाला असणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.