(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल : एकनाथ खडसे
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत तळ ठोकून होते. यावर भाजप ज्येष्ठ नेते यांनी टिप्पणी केली आहे. फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला फायदाच होईल, असं ते म्हणाले.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार का याबद्दल चर्चा सुरु असताना भाजपचे ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी त्याबद्दल महत्त्वाची टिपण्णी केली आहे. दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं तर तसा निर्णय होऊ शकतो, असं खडसेंनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत आले तर आनंदच होईल, स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत आले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते. काल (5 फेब्रुवारी) ही जबाबदारी संपवून महाराष्ट्रात परत जाण्याआधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती.
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षातील गटबाजीची चौकशी सुरु
देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेकांचं फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपावरुन चौकशी समिती नेमली गेली आहे. त्यात खडसेंचाही फोन टॅप झाल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या आहेत. त्यावर बोलतानाही खडसेंनी जोरदार नाराजी व्यक्त केली. "माझा फोन टॅप केला असेल तर ते दुर्दैवी आहे. विरोधी पक्षनेते पदावर काम करताना त्या काळात फोन टॅपिंग होत असे हे अधिकाऱ्यांकडून ऐकत होतो. पण नंतर तर मी सत्ताधारी पक्षात होतो. तेव्हा माझ्यावर फोन टॅपिंगने पाळत ठेवण्याची काय गरज होती..त्याचं काय कारण होतं," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातले भाजपचे अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत प्रचारासाठी तळ ठोकून होते. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रक वाटण्यावरुन सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यावर बोलताना खडसे म्हणाले की, "प्रदेशाध्यक्ष पत्रक वाटताना दिसले यात मला आनंद आहे. अभिमान वाटला. प्रदेशाध्यक्ष झाले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता जागा आहे." तसंच दिल्लीत आल्यानंतर आपण राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेणार आहोत, असंही खडसे म्हणाले.