भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षातील गटबाजीची चौकशी सुरू
याआधीही निवडून आलेल्या पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक सदस्यीय सहा समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या विरोधात तक्रारी होत्या त्या एकाही नेत्याच्या विरोधात कारवाई झाली नव्हती. त्यामुळे भूतकाळ पाहता भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि जाहीर तक्रारीनंतर कोणत्याही मोठ्या नेत्याच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता नाही.
मुंबई : विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्तांतराचं राजकीय नाट्य घडून आलं आणि सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळालं. तर राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. परंतु, यासर्व घडामोडींनंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे भाजप नेते राम शिंदे, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिलें या तिघांनी राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
याआधीही निवडून आलेल्या पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी एक सदस्यीय सहा समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. यामध्ये ठाणे आणि कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागांसाठी प्रत्येकी एका समितीची स्थापना केली होती. सहा समित्यांचे लिखित अहवाल प्रदेश कार्यकारिणीला सादर करण्यात आले होते. ज्यांच्या विरोधात तक्रारी होत्या त्या एकाही नेत्याच्या विरोधात कारवाई झालेली नाही. त्यावेळी प्रत्येकाला बोलावून प्रदेश कार्यकारिणी समोर चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे भूतकाळ पाहता भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि जाहीर तक्रारीनंतर कोणत्याही मोठ्या नेत्याच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड हेदेखील उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रावर आरोप केले होते. अशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे पाटलांना यांना लक्ष्य केलं होतं. ''पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,'' अशी टीकाही भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाहीर आपली खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेटही घेतली होती.
पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळे
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसें यांनी केला होता. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कुणी काम केले याची विश्लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत, असं खडसे यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
भाजपच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, मुंबईतल्या भाजपच्या बैठकीनंतर राम शिंदे आणि विखेंची प्रतिक्रिया
निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना जेपी नड्डांचं आश्वासन