(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICSE Board Result : आयसीएसई दहावी बोर्डचा निकाल उद्या, दोन्ही सत्रांना समान महत्व देऊन अंतिम निकाल
ICSE : कोरोनामुळे दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली असून या दोन्ही सत्रांना समान महत्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. सेमिस्टर एक आणि सेमिस्टर असं दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.
काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक आणि सत्र दोन या दोन्ही परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांनी सत्र एक किंवा सत्र दोन मधील एकही परीक्षा दिली नसेल तर अनुपस्थित म्हणून निकाल येईल. शाळा सुद्धा प्रिन्सिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून निकाल पाहू शकतील.
पुढच्या वर्षीपासून एक टर्ममध्ये परीक्षा
यावर्षी महामारीमुळे, CBSE (CBSE परीक्षा 2022) आणि CISCE (CISCE परीक्षा 2022) बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात आल्या होत्या. मुख्य परीक्षा टर्म एक (Term 1) आणि टर्म टू (Term 2) अशा दोन भागांमध्ये विभागली गेली होती. या पॅटर्नबाबत, कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) नं जाहीर केलं आहे की, पुढील वर्षापासून ते दोन नव्हे तर एकाच वेळी परीक्षा घेतील. म्हणजेच, CISCE बोर्डानं पुन्हा जुन्या पॅटर्नवर येण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून, ISC (ISC Exams 2023) आणि ICSE (ICSE Exams 2023) च्या अंतिम परीक्षा फक्त एकदाच घेतल्या जातील.