HP Elections: भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मोदी, शाह, गडकरींसह 40 जणांची फौज उतरणार
Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. आज भाजपाने 40 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
BJP Star Campaigners, HP Elections : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. आज भाजपाने 40 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह 40 जणांचा समावेश आहे.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षानं प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी भाजपानेही कंबर कसली असून प्लॅन तयार केला आहे. भाजपाने प्रचारासाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसह प्रवक्तेही मैदानात उतरवले आहेत. त्याशिवाय पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
BJP releases a list of star campaigners for #HimachalPradeshElections
— ANI (@ANI) October 21, 2022
PM Modi, party chief JP Nadda, Defence Min Rajnath Singh, HM Shah, CM Thakur, MP CM SS Chouhan, UP CM Yogi Adityanath, Haryana CM ML Khattar, Uttarkhand CM PS Dhami, Karnataka MP Tejasvi Surya in the list. pic.twitter.com/Yov34m1vJZ
उमेदवारांची घोषणा -
हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत 68 उमेदरांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 62 तर दुसऱ्या यादीत सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे नावही दुसऱ्या यादीत नाही. यावरून आता ते निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
19 नव्या चेहऱ्यांना संधी -
भाजपच्या उमेदवारांच्या यादीत 19 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. हे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत पाच डॉक्टर आणि एका निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याची (आयएएस) नावे आहेत. भाजपने शिमल्याच्या आयजीएमसी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनक राज यांना भरमौरमधून, अॅलोपॅथिक डॉक्टर राजेश कश्यप आणि डॉ. अनिल धीमान यांना सोलन आणि भोरंजमधून, आयुर्वेदिक डॉक्टर राजीव सैजल यांना कसौलीतून आणि राजीव बिंदल यांना नाहानमधून तिकीट देण्यात आले आहे. निवृत्त आयएएस अधिकारी जेआर कटवाल यांना झंडुटा येथून तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पाच महिलांची नावे आहेत. शाहपूर मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री सरवीन चौधरी पुन्हा रिंगणात आहेत. सिराजमधून मुख्यमंत्री जयराम ठाकूर उमेदवार असतील.
11 आमदारांची तिकिटे कापली
तर आमदार रीना कश्यप यांना पच्छाडमधून तर रिटा धीमान यांना इंदोरा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. यासोबतच भाजपने पहिल्या यादीत मंत्री महेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह 11 आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्याचबरोबर दोन मंत्र्यांचे विधानसभा मतदारसंघही बदलण्यात आले आहेत.
एकाच टप्प्यात मतदान -
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. त्याची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती. 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.