Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास?
Goa Libration Day : 1947 साली भारत स्वतंत्र झाला. पण, महाराष्ट्राशेजारील गोव्याच्या जनतेला पोर्तुगीजांच्या जाचातून स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा संघर्ष करावा लागला. काय आहे इतिहास?
Goa Liberation Day : 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यातील जनतेला मात्र 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि यानंतर गोवन जनतेचा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष तोही थोडक्या कालावधीसाठी नाही तर तब्बल 14 वर्ष चालला आणि अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. जाणून घ्या कशी होती गोवा मुक्ति संग्रामाची लढाई...
गोवा मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास
पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या 14 वर्षानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला हे स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. गोवा हा नेहमीच स्वतंत्र भारताचा भाग नव्हता. 1961 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते भारतीय राज्य बनले. संपूर्ण लष्करी कारवाई यशस्वीपणे पार पडण्यासाठी सुमारे तीन दिवस लागल्याचे सांगण्यात येत आहे. आणि त्याच ऐतिहासिक घटनेच्या सन्मानार्थ, गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. भारतीय इतिहासातील हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, ज्याने आपल्या देशाला अनेक शतके चाललेल्या परकीय राजवटीतून पूर्णपणे मुक्त केले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरु केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणं, बोलणंही सेन्सॉर केलं. आणि गोव्याला पोर्तुगीजांची वसाहत म्हणून मान्यता असल्यानं भारतीय लोक इथं घुसखोरीचा प्रयत्न करतायत अशी बोंब मारली.
पोर्तुगीजांनी गोव्यात पाऊल ठेवल्यानंतर आपलं खरं रुप दाखवलं. कारण इंग्रजांसारखं केवळ व्यापार करणं एवढंच पोर्तुगीजांचं ध्येय नव्हतं. गोव्यात आत्ताप्रमाणच त्याकाळीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांची जगण्याची पद्धत वेगवेगळी होती. खानपान, प्रतिकं वेगवेगळी होती, मात्र त्यात संघर्ष नव्हता. पण पोर्तुगीजांनी इथं आल्यानंतर धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरु केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरु केले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोवन जनता कंटाळली होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरु केली.
भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे 25 वे राज्य बनले.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'हे दारू विकणाऱ्यांचे सरकार', देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल
- विचित्र अपघात... गाडी रिव्हर्स घेताना ताबा सुटला अन् तीन मित्रांना चिरडलं
- Golden Temple : सुवर्ण मंदिरातील धक्कादायक प्रकार, तरुणाकडून दरबार साहिब येथील नियमांचा भंग, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha