... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संवैधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. आज 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून जालना जिल्ह्यातील अंतरावली येथील त्यांच्या उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे. तर, दुसरीकडे जालना जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा पदभार मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी स्वीकारला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहन केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मनोज जरांगेंच्या आंदोलनास भेट देण्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संवैधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, आज माझा जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तिथलं वातावरण कसं असतं ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेल, आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, असे उत्तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. पंकजा मुंडे ह्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला, यावेली विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
अशोक चव्हाण लवकरच मनोज जरांगेंना भेटतील
भाजप खासदार आणि मराठवाड्यातील मराठा नेते अशोक चव्हाण यांनीही लवकरच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे म्हटलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची उर्वरित विषय आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत. जरांगे पाटलांना मी विनंती करत आहे की, उपोषणाचा मार्ग न स्वीकारता सरकार आता नवीन आलेला आहे. आता, मला जरांगे पाटलाला भेटायची इच्छा आहे. उर्वरित मागण्या मी समजून घेईल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, याही आधी 10 टक्के आरक्षण दिलेले आहे आणि ते लागूदेखील केले आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले.