अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
प्रजासत्ताक दिनी त्यांचा ताफा मुंबईकडे येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताफा थांबवून दुचाकीस्वार अपघातग्रस्तला मदत केली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संवेदनशील असून वैद्यकीय मदतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळेच, राज्याचे आरोग्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळल्याचं यापूर्वी आपण पाहिल आहे. तसेच, मुख्यमंत्रीपदी असतानाही अनेकदा त्यांच्यातला सर्वसामान्यपणा पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी रस्त्यातील अपघातानंतर स्वत:चा ताफा थांबवून जखमींना मदत केल्याची घटना घडली होती. आता, राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी असताना ते मी आता 'सीएम' चा 'डिसीएम' झाल्याचे सांगात. त्यांच्या डीसीएम पदाचा अर्थ सांगताना ते मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन असल्याचंही ते म्हणतात. आज त्यांच्यातील यी डीसीएमची प्रचिती अनेकांना आली. प्रजासत्ताक दिनी त्यांचा ताफा मुंबईकडे (Mumbai) येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी गाडीचा ताफा थांबवून दुचाकीस्वार अपघातग्रस्तला (Accident) मदत केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले होते. एकनाथ शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ त्यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिस सोबत देऊन या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच गाडीत बसलेल्या तरुणाला 'तू सुखरूप आहेस काळजी करू नकोस, आपण तुला पूर्ण बरे करू' असे सांगून आधार दिला. त्यामुळे, शिंदेंच्या ताफ्यातील सर्वांनीची उपमुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा स्वत: पाहिला. दरम्यान, संबंधित युवकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे हे आपल्या भाषणात कायमच मी 'सीएम' म्हणजे 'चीफ मिनीस्टर' नसून मी 'सीएम' म्हणजेच 'कॉमन मॅन' आहे असे सांगायचे. मात्र, आता उपमुख्यमंत्री म्हणजे 'डिसीएम' झाल्यावर आपण 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असल्याचे ते सांगू लागले. मात्र, त्यांचे हे वक्तव्य 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिलंय.