येत्या सहा महिन्यात वाहनांना 'फ्लेक्स फ्यूएल इंजिन' बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
फ्लेक्स फ्यूएल इंजिन (Flex Fuel Engine) हे एका पेक्षा अधिक इंधनावर चालते. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : तुम्ही वाहनप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. इंधन दरवाढीला वैतागला असाल तर लवकरच तुम्हाला परवडेल अशा दरात वाहन चालवणारं इंजिन मिळणार आहे. कारण, येत्या 6 महिन्यात देशातील प्रत्येक वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन (Flex Fuel Engine) अनिवार्य करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलीय. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या 'ग्रीन एनर्जी अवॉर्ड' या कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाल की, "पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेल्यानं सर्वसामान्यांना त्याचा वापर परवडत नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक या पर्यायांवर चालणारं इंजिन बनवण्याच्या सूचना वाहन निर्मिती कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. या सर्वामध्ये इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे आहे."
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा वेगवेगळे पर्याय सुचवले आहेत. माझी इच्छा आहे की देशातून पेट्रोल-डिझेल पंप हद्दपार व्हावेत असंही ते म्हणाले आहेत. पेट्रोल-डिझेल च्या मोठ्या प्रमाणात आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. तसेच या इंधनांमुळे देशातील प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. या सर्वांचा विचार करुन केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काही धोरणं आखली आहेत. 2030 सालापर्यंत देशातील रस्त्यांवर 30 टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक वाहनं असतील असं सरकारचं ध्येय आहे.
महत्वाच्या बातम्या :