एक्स्प्लोर
पाच राज्यांच्या निकालानंतर कोण काय म्हणालं?

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, उत्तराखंडमध्येही बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का मिळाल्याचं चित्र आहे. निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यावर सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कौल मान्य केला. भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर उत्तर प्रदेशात सपामध्ये, पंजाबमध्ये आप, तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये शुकशुकाट आहे. निकालानंतर नेत्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी (पंतप्रधान) –
उत्तर प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार मानतो. भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय आहे. वाराणसीतील जनतेचं प्रेम पाहून भारावून गेलो आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशवासियांचे आभार मानले. उत्तराखंडमधील विजयही महत्त्वाचा आहे. देवभूमीतील जनतेचे आभार. भाजप जनतेची सेवा करेल, असा विश्वास उत्तराखंडमधील जनतेला देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.अखिलेश यादव (मावळते मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश) –
निवडणुकीचा निकाल स्वीकारत असून, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र, ईव्हीएमवरील आरोपांची चौकशी व्हावी, अशी निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आगामी सरकारने आमच्यापेक्षा चांगलं काम करावं. नवं सरकार ‘समाजवादी’पेक्षा चांगलं काम कसं करतं, हे पाहण्यासाठी उत्सुकता आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यास आनंदच होईल, असेही अखिलेश यांनी म्हटलं. आमची ‘सायकल’ ट्युबलेस आहे, कधीच पंक्चर होत नाही, असे म्हणत अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा काहीसा प्रयत्नही केला.राहुल गांधी (उपाध्यक्ष, काँग्रेस) –
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन केलं. राहुल गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांचंही अभिनंदन केलं. पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल-भाजपचा पराभव करत दणदणीत यश मिळवलं आहे. पंजाबच्या 117 जागांपैकी 77 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. देशातील जनतेचं मन जिंकत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष कायम राहील, असंही राहुल गांधी म्हणाले.अमित शाह (राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप) –
जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार या सगळ्याला मतदारांनीच चोख प्रत्युत्तर दिल्याचं निकालातून दिसतंय. अमेठी,रायबरेलीत 10 पैकी 6 जागांवर भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे, असेही अमित शाह म्हणाले. भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या संध्याकाळी बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या बैठकीत समावेश असेल. याच बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मुख्यंमत्रिपदाचा निर्णय होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. मायावती यांच्या ईव्हीएमबाबतच्या आरोपांवर अमित शाह यांनी बोलणं टाळलं. मात्र, हिंदू-मुस्लीम यातून बाहेर पडा, मतदार हा मतदारच असतो. सगळ्या देशातला गरीब वर्ग मोदींच्या विविध योजनांमुळे जोडला गेलाय, त्याला जात-धर्म-पंथ या नजरेतून पाहणं सोडून द्या, असा टोला अमित शाह यांनी लगावला.मायावती (राष्ट्रीय अध्यक्षा, बसप) –
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी EVM वर आक्षेप घेत मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर भाजपने मतदान यंत्रात घोळ करुन विजय मिळवल्याचा गंभीर आरोपही मायावतींनी केला. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मतमोजणी थांबवून, हा निकाल रद्द करा अशी मागणी मायावतींनी केली. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल, तर त्यांनी ही निवडणूक रद्द करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्यावी असं मायावती म्हणाल्या. मुस्लिम बहुल भागात जिथे भाजपचं काहीही अस्तित्व नव्हतं तिथे भाजपचा उमेदवार कसा काय विजयी होऊ शकतो, असा सवाल मायावतींनी केला. याशिवाय EVM ची परदेशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, पुन्हा मतपत्रिकेद्वारे फेरमतदान घ्यावं, अशी मागणी मायावतींनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.शरद पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) –
मला उत्तर प्रदेशातील निकाल भाजपच्या बाजूने लागणार हे अपेक्षितच होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पंतप्रधान आणि भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकीकडे पूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळे व एका बाजूला भाजप तर दूसऱ्या बाजूला तीन वेगेवेगळ्या संघटना. यात बसप स्वतंत्र लढली, समाजवादी पक्ष व काँग्रेस एकत्र लढली. अजित सिंग यांचा पक्ष स्वतंत्र लढला, त्यामुळे सहाजिकच भाजपला फायदा होणार, यात शंका नाही, असे पवार म्हणाले. पंजाबमध्ये लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस अभिनंदनास पात्र आहे. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे. देशात अन्नधान्याच्या बाबतीत महत्वाची कामगिरी करणारे राज्य आहे. त्यामुळे काँग्रेसने देखील त्याठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले. शिवाय, मी या निर्णयाने स्वतः उत्साहीही नाही आणि नाउमेदही नाही, असेही पवारांनी नमूद केले.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) –
आजच्या नवयुगावर देशाचा विश्वास आहे, हे युग देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील जनतेचे आभार मानले. आज देशातील सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केला, त्याचा हा विजय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. नोटाबंदीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी नावं ठेवली होती, त्या सगळ्यांना निवडणुकांनी उत्तर दिलं आहे. जे विरोध करत होते, ज्यांनी त्रास सहन केला नाही, त्यांना जागा दाखवण्याचं काम या निकालाने केलं, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचसोबत, देशातील सर्वात मोठ्या राज्यात जो विजय मिळाला, त्यातून देशाचा मूड काय हे अधोरेखित झालं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व यशानंतर भाजपने नवा इतिहास रचला आहे. हा नवा अध्याय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.संजय राऊत (खासदार, शिवसेना) –
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील विजयाबाबत भाजपचं अभिनंदन करत आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लोकशाहीच्या प्रक्रियेतून आले आहेत. भाजपला मिळालेल्या यशाचं आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आम्ही अभिनंदन करतो, असं संजय राऊत म्हणाले. लोकांना जिथे पर्याय दिसला तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केलं. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलत आहे. विजय हा विजय असतो, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
आणखी वाचा























