(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम रहीमला झेड प्लस सुरक्षा; खलिस्तान्यांपासून धोका असल्याचा हरियाणा पोलिसांचा दावा
Ram Rahim : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीम 21 दिवसांच्या सुट्टीवर आहे. अशातच त्यासा आता हरियाणा पोलिसांनी झेड प्लस सुरक्षा पुरवली आहे.
Ram Rahim : बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या बाबा राम रहीमला चक्क झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. बाबा रामरहीमला खलिस्तान्यांपासून धोका असल्याचं सांगत हरियाणा सरकारनं ही सुरक्षा पुरवली आहे. सध्या तब्येतीच्या कारणास्तव राम रहीम पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. मात्र पंजाब निवडणुकीपूर्वी राम रहीम तुरुंगातून बाहेर पडल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीम 21 दिवसांच्या सुट्टीवर आहे. निवडणुकीपूर्वी मिळालेल्या पॅरोलवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हरियाणा सरकारला घेरले होते. खरं तर, सिरसा-मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. मात्र, सीएम खट्टर म्हणाले होते की, राम रहीमला दिलेल्या पॅरोलचा पंजाब निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
गेल्या वर्षीही राम रहीमला आजारी आईला भेटण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपात्कालीन पॅरोल मंजूर करण्यात आला होता. प्रकृतीचे कारण सांगून तो काही वेळा तुरुंगातून बाहेरही आला होता. राम रहीम आत्तापर्यंत हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात बंद होता.
राम रहीमला काही अटींसह पॅरोल देण्यात आला होता. यामध्ये त्यांना जाहीर सभा घेता आली नाही. यासोबतच राम रहीमला परवानगीशिवाय शहर सोडण्यास मनाई करण्यात आली होती. एका प्रकारे, पॅरोल म्हणजे, शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी सुट्टी. पॅरोल अंतर्गत, कैद्याला विशिष्ट कालावधीसाठी त्याच्या घरी जाण्याची परवानगी आहे.
राम रहीमला का झाली होती शिक्षा?
सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम (54 वर्ष) 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयानं ऑगस्ट 2017 मध्ये या प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुरमीत राम रहीमला डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंह यांच्या हत्येप्रकरणीही न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, भारतात X, Y, Y-Plus Z आणि Z-Plus सुरक्षा देण्यात येते. झेड प्लस सुरक्षा ही भारतातील सर्वात मोठ्या दर्जाची सुरक्षा आहे. जी देशातील VVIP लोकांना गरजेनुसार दिली जाते. याशिवाय पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) संरक्षण मिळते.