(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bird Flu Death : दिल्लीतील AIIMSमध्ये बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू, संपर्कात आलेले नर्स, डॉक्टर्स आयसोलेशनमध्ये
दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात 11 वर्षांच्या मुलाचा बर्ड फ्लुमुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
Bird Flu Death : कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप सुरुच आहे. अशातच यंदा देशात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 11 वर्षाच्या मुलाचा एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हरियाणामधील होता. एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आलं आहे.
या एविएन इन्फ्लुएन्जा H5N1ची लागण झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला देशातील अनेक राज्यांत कोरोनासोबतच बर्ड फ्लूचाही प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक ठिकाणी बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या.
कसा पसरतो बर्ड फ्लू?
एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या संपर्कात आल्याने या आजाराची लागण होऊ शकते. संसर्ग झालेला पक्षी, त्याचे पंख किंवा त्याच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानंही बर्ड फ्यूचा मानवाला संसर्ग होऊ शकतो. या आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्षांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना अधिक आहे. जगभरात अनेक पोल्ट्री फर्म आहेत. अशा ठिकाणी दररोज पक्षांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येतात. असं असलं तरिदेखील याबाबतीत अनेक अपवादात्मक प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, आजारी पक्षाच्या संपर्कात आल्यानं बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. पक्षाची अंडी किंवा त्याची विष्ठा अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने धोका अधिक वाढतो.
खरचं, बर्ड फ्लू संसर्गजन्य आहे का?
बर्ड फ्लूचा संसर्ग अनेक पक्षांच्या प्रजातींमध्ये वेगाने होतो. परंतु, साधारणपणे, एविएन इन्फ्लुएन्जा हा व्हायरस किंवा बर्ड फ्लू व्यक्ती किंवा पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक नाही. दरम्यान, एखाद्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग झाल्याची प्रकरणं फारच कमी दिसून आली आहेत. अशातच बर्ड फ्यूचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेणंही धोकादायक ठरु शकतं.
काय आहे बर्ड फ्लूची लक्षणं?
साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 8 दिवसांनी लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळांचे आजार यांसारखी लक्षणं दिसून येतात. प्रौढ व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही याच लक्षणांचा सामना करावा लागतो. तसेच हे व्हायरल संक्रमण वाढून न्यूमोनिया होऊ शकतो आणि कधी-कधी श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bird Flu Symptoms : बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?