Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
Jalgaon News: जळगाव जामोद मतदारसंघात माजी मंत्री संजय कुटेना शह देण्यासाठी वंचितची खेळी. वंचितकडून प्रख्यात सर्जन डॉ.प्रवीण पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. जळगाव जामोदमध्ये होणार तीन डॉक्टरांकडे लढत.
बुलढाणा: जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत तीन डॉक्टरांमध्ये लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग चार वेळा विजय प्राप्त केलेले भाजपाचे (BJP) उमेदवार व माजी मंत्री संजय कुटे (Sanjay Kute) यांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ही यावेळी नवीन व उच्च शिक्षित असलेले व याच मतदार संघातील असलेले डॉ.प्रवीण पाटील (Pravin Patil) यांना रिंगणात उतरवण्याची योजना आखली आहे.
डॉ.प्रवीण पाटील हे अकोल्यातील प्रख्यात सर्जन आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायातून त्यांनी मोठी सामाजिक बांधिलकी जपत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. डॉ.प्रवीण पाटील यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात (jalgaon jamod vidhan sabha constituency) मेळावे , बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने लक्षणीय मते घेतली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद मतदार संघात तीन डॉक्टरांची लढत होऊ शकते. यात भाजपाचे डॉ.संजय कुटे , काँग्रेसच्या डॉ.स्वाती वाकेकर तर वंचितकडून डॉ.प्रवीण पाटील वंचितच्या या खेळीने जळगाव जामोद मतदारसंघात मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत संजय कुटे हे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत होते. संजय कुटे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विजयात संजय कुटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही निवडणूक प्रतापराव जाधव यांच्यासाठी आव्हानात्मक मानली जात होती. यावेळी संजय कुटे यांच्या प्रभावामुळे खामगाव आणि जळगाव जामोद या दोन मतदारसंघांमधून प्रतापराव जाधव यांना दीड लाखापेक्षा अधिक मतं मिळाली होती.
हिंगोलीत रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्या
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज हिंगोलीत रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी दुपारी दोन वाजता करण्यात आले होते. परंतु कार्यक्रमाला गर्दी जमत नसल्याने दोन वाजता आयोजित केलेला कार्यक्रम 4 वाजता सुरू करण्यात आला. तरीही मात्र मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्याच पाहायला मिळाल्या. शेवटी कंटाळून रावसाहेब दानवे यांनीच कार्यकर्त्यांना पुढे येऊन बसायला सांगितले. रिकाम्या खुर्च्या मागे सोडा आणि पुढील खुर्च्यांवर बसण्याची विनंती रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केली.
आणखी वाचा
विधानसभेत काँग्रेसच काय कुणालाही पाठिंबा नाही, वंचित नेते प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले, म्हणाले....