Dawood Ibrahim : कधी कोरोना, कधी हृदयविकाराचा झटका; दाऊदच्या मृत्यूच्या आधीही अफवा
Dawood Ibrahim Death : दाऊदच्या मृत्यूची बातमी फक्त आजच समोर आली नाही. तर, याआधीदेखील त्याच्या मृत्यूबाबत अफवा पसरल्या होत्या.
Dawood Ibrahim Death News : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग झाला असल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर दाऊदच्या आरोग्याबाबत उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. दाऊदची प्रकृती गंभीर असण्यापासून ते त्याचा मृत्यू झाल्याचे दावे करण्यात आले. मात्र, दाऊदच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच अशा वावड्या उठल्या नाहीत. या आधीदेखील दाऊदच्या मृत्यूबाबत अनेक वृत्त समोर आले होते.
दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहे. भारतातून पळून गेल्यानंतर तो दुबईत गेला. त्यानंतर तिथून तो पाकिस्तानात आला आणि सध्या तिथेच आहे. पाकिस्तानने 2020 मध्ये फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सला एक यादी सादर केली होती, ज्यामध्ये दाऊदचे नाव होते. त्यामुळे नकळत का होईना, पाकिस्तानने दाऊद आपल्या देशात असल्याचे मान्य केले होते.
याआधीदेखील दाऊदच्या मृत्यू बातम्या
भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद हा अफवा आणि विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तात अनेक वेळा मरण पावला आहे. मात्र, दरवेळेस त्याच्या मृत्यूच्या बातम्या अफवाच ठरल्या. कोरोना महासाथीच्या काळात त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. दाऊदला कोरोनाची लागण झाली आणि उपचारादरम्यानच त्याला हृदयविकाराचा झटका आला. यातच त्याचे निधन झाल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्तदेखील अफवा असल्याचे समोर आले. मात्र, कोरोनाच्या लाटेत त्याचा पुतण्या सिराजचा मृत्यू झाला होता.
वर्ष 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने दाऊदचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. काही वृत्तांमध्ये दाऊदला ब्रेन ट्युमर होता, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर दाऊदचा उजवा हात असलेल्या छोटा शकीलने दाऊद पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले.
वर्ष 2016 मध्ये सोशल मीडियावर अशीच एक अफवा आली होती. त्यानुसार दाऊदच्या पायाला गँगरीन झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा पाय कापला असल्याची चर्चा होती. मात्र, हे वृत्तही निराधार निघाले.
मागील काही दिवसांमध्ये भारतातील अनेक मोस्ट वाँटेड आरोपी, दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये ठार झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे आज दाऊदच्या आरोग्याशी संबंधित बातमी समोर आल्यानंतर बहुतांशीजणांना ही बातमी खरी वाटली. दाऊदच्या मृत्यूबाबत अथवा प्रकृतीबाबत भारत सरकार अथवा पाकिस्तान सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.