(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोविशिल्डच्या दुसर्या डोससाठी CoWIN पोर्टलमध्ये बदल; आधीची अपॉईंटमेंट वैध राहणार
13 मे रोजी सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविले होते. यासाठी आता को-विन पोर्टलवर बदल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी घेतलेला वेळ (अपॉईंटमेंट) वैध असेल आणि को-विन पोर्टलवर तो रद्द केला जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (रविवारी) स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही. 13 मे रोजी केंद्राने कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील कालावधी 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविला आहे.
मंत्रालयाने सांगितले, की 'भारत सरकारने या बदलाबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यास 12-16 आठवड्याच्या अंतराने सूचित करण्यासाठी को-विन पोर्टलमध्ये देखील आवश्यक बदल केले गेले आहेत.
'माध्यमांतील काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की को-विन पोर्टलवर दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांपेक्षा कमी कालावधीत ज्यांनी अॅपॉईंटमेंट घेतली आहे, त्यांना डोस न मिळताच माघारी यावे लागत आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वी दुसऱ्या डोससाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, ती वैध राहणार आहे. यावेळी पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना दुसर्या डोस 84 दिवसांनंतर घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लस वापरण्यात येत आहेत.