Consumer App | कन्झ्युमर अॅपवर ई कॉमर्स आणि बँकिंग क्षेत्राच्या सर्वाधिक तक्रारी
ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी सरकारने कन्झ्युमर अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपवर ई-कॉमर्स, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक, वीज या क्षेत्रातील सर्वाधिक तक्रारी येत आहेत. सरकारकडून अनेक तक्रारींचं निवरणही करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : देशात ई-कॉमर्सचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचं ऑनलाईन नेटवर्क सर्वत्र पसरत आहे. मात्र यासोबत अनेक तक्रारी, समस्याही वाढत आहेत. भारत सरकारने 1 ऑक्टोबरला ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कन्झ्युमर अॅप लॉन्च केलं आहे. या अॅपच्या मदतीने मिळत असलेल्या तक्रारींवरुन स्पष्ट होत आहे की, ऑनलाईन शॉपिंग साईट्सच्या कंपन्यांच्या कारभारावर ग्राहक संतुष्ट नाहीत.
आतापर्यंत मिळालेल्या एकूण तक्रारींपैकी 40 टक्के तक्रारी या ई कॉमर्स व्यापाराशी निगडीत आहेत. आतापर्यंत 556 तक्रारी आहेत, ज्यापैकी 138 तकारींचं निवारण करण्यात आलं असून 418 तक्रारी प्रलंबित आहेत. सरकारच्या माहितीनुसार ई कॉमर्सशी जोडलेल्या अनेक तक्रारी या सामनाच्या गुणवत्तेविषयी आहेत. अनेक ग्राहकांचं म्हणण आहे की, अनेकदा शॉपिंग वेबसाईटवर दाखवलेली वस्तू आणि प्रत्यक्ष आमच्यापर्यंत आलेले वस्तू यामध्ये फरक असतो. सामनाची गॅरंटी आणि रिटर्न संबंधी देखील ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत.
बँकिंग क्षेत्राबाबतही तक्रारी
ई कॉमर्सनंतर सर्वाधिक तक्रारी या बँकिंग क्षेत्राशी निगडित आहेत. आतापर्यंत बँकिंग क्षेत्रातील 196 तक्रारी सरकारच्या अॅपवर प्राप्त झाल्या आहे. ज्यापैकी 78 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. तर 118 प्रलंबित आहेत. त्यानंतर टेलिकॉम सेक्टरमधील 132 तक्रारी प्राप्त झाल्या असून 51 तक्रारींच निवारण झालं आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक, वीज, ब्रॉडबँड आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रांचा समावेश आहे. या अॅपवर आतापर्यंत एकूण 2217 तक्रारी आल्या आहेत. ज्यापैकी 944 तक्रारींचं निवारण झालं आहे.
निवारण झालेल्या तक्रारींपैकी 922 तक्रारी दाखल झाल्याच्या 15 दिवसांच्या आत सोडवण्यात आल्या आहेत. मात्र या केवळ अॅपवर आलेल्या तक्रारी आहेत. याशिवाय संबंधित मंत्रालयाच्या नॅशनल कन्झुमर हेल्पलाईनवर रोज तक्रारींसाठी हजारो फोन येत असतात.
या अॅपची खास गोष्ट म्हणजे यावर आलेल्या तक्रारींवर या विभागाचे मंत्री रामविलास पासवान यांचं लक्ष असतं. त्यामुळे या अॅपवर आलेल्या प्रत्येक तक्रारीची माहिती रामविलास पासवान यांच्यापर्यंत पोहोचते.