एक्स्प्लोर
Advertisement
सुषमा स्वराज यांनी एक रुपया फी घेण्यासाठी बोलावलं होतं : हरीश साळवे
उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती, अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 67व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला नेत्या होत्या.
नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान वयाच्या 67व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर राजकारण्यांपासून सामान्य नागरिक दु:ख व्यक्त आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचाही समावेश आहे.
सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे म्हणाले की, "त्या अतिशय आनंद होत्या. त्या कमालीच्या नेत्या होत्या. माझी मोठी बहिण या जगात राहिली नाही, असं मला वाटतंय. तसंच सुषमा स्वराज यांच्याशी रात्रीच फोनवरुन बातचीत झाल्याचं हरीश साळवे यांनी सांगितलं. कुलभूषण जाधव प्रकरणाची फी घेण्यासाठी सुषमा स्वराज यांनी बोलावलं होतं, असं साळवे म्हणाले.
हरीश साळवे म्हणाले की, "मला धक्का बसला आहे. मी रात्री 8.45 वाजता सुषमा स्वराज यांच्याशी फोनवर बातचीत केली होती. तेव्हा त्यांची तब्येत ठीक वाटत होती. आता सुषमा स्वराज नाहीत, हे ऐकून मी स्तब्ध झालोय. त्यांचं जाणं हे संपूर्ण देशाचं नुकसान आहे. विशेषत: माझं वैयक्तिक नुकसान आहे."
पुढे हरीश साळवे यांनी सांगितलं की, "निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जी केस तुम्ही जिंकली, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या."
हेरगिरीच्या आरोपात कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने मार्च 2016 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतरही पाकिस्तान सातत्याने त्यांना भेटण्यास मनाई करत होता. यानंतर पाकिस्तानच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मग भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उपस्थित केला. यासाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधव पर्यायाने भारताची बाजू लढवण्याचा निर्णय घेतला होता.
सुषमा स्वराज यांची कारकीर्द
- 14 फेब्रुवारी 1952 मध्ये हरयाणातील अंबाला छावणीमध्ये सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
- त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली
- चंदीगडमधून लॉची पदवी घेतली
- 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला
- त्यानंतर काही काळ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. त्यांचे पती स्वराज कौशलही याच काळात सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते.
- 1977 मध्ये त्या हरयाणाच्या अंबाला छावणी विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा निवडून आल्या
- 1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाल्या.
- 13 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर 1998 या काळात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिला.
- अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2000-2003 दरम्यान त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले.
- 2003-2004 दरम्यान त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले,
- तसेच त्यांनी दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला.
- 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती.
- 2014 ते 2019 या काळात सुषमा स्वराज या देशाच्या पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement