एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसच्या नाराज आमदारांची मनधरणी करणारे आणि भाजपला नडणारे डी.के. शिवकुमार कोण आहेत?
कर्नाटकातील सत्तासंघर्ष रोज नवी वळणं घेत आहे. कर्नाटकातील विरोधक काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडून नवं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार कर्नाटकातील सरकार वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
मुंबई : कर्नाटकातील सत्तासंघर्ष रोज नवी वळणं घेत आहे. कर्नाटकातील विरोधक काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडून नवं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार कर्नाटकातील सरकार वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. देशातली काँग्रेस गलितगात्र असताना कर्नाटकात डी.के. मात्र भाजपशी सरळ सरळ फाईट करत आहेत.
काँग्रेसच्या 12 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर ते थेट मुंबईत अवतरले. पवईच्या रेनेसां हॉटेलात बंडखोर आमदारांचा मुक्काम होता. भाजप नेते त्यांच्या सरबराईला होते. त्यामुळे मुंगीदेखील त्या बंडखोर आमदारांपर्यंत पोहोचू नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु डी.के. थेट भिडले. त्यांनी रेनेसांचं बुकिंग केलं. एकटे मुंबईत आले. आणि आपल्या काँग्रेसमधील मित्रांसोबत कॉफी प्यायला आल्याचे सांगत भाजपात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे डी.के. रेनेसांमध्ये पोहोचले तेव्हा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना तर त्याचा पत्तादेखील नव्हता.
त्यानंतर डी.केंनी काँग्रेसमधील आमदारांना मनवण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला. परंतु विश्वासदर्शक ठरावावेळीही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीकेंनी संवैधानिक पेचप्रसंग निर्माण केला. विश्वासमत पुढं ढकललं.
डीकेंच्या निडर आणि बेधडक स्वभावाची ख्याती कर्नाटकातच नव्हे तर दिल्लीतही आहे. कारण याआधी डीकेंनी सलग दोनवेळा अमित शाह आणि मोदींनाच शिंगावर घेतलं होतं. काँग्रेसच्या भल्याभल्यांना जे जमलं नाही ते डीकेंनी केलं.
2017 मध्ये अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार होते. काँग्रेसला बंडखोरीची भीती होती. 44 आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी डीकेंवर होती. डीकेंनी त्यांना बंगळुरुच्या गोल्फ रिसॉर्टमध्ये ठेवलं. डीके आडवे आल्याने भाजपचे मिशन अहमद पटेल अडचणीत आलं. डीकेंची कार्यालयं आणि घरांवर थेट आयटीच्या धाडी पडल्या. डीकेंना गोल्फ रिसॉर्टमधून अधिकाऱ्यांनी घरी नेलं. पण तरीही डीकेंच्या लोकांचं सुरक्षाकवच भाजप भेदू शकलं नाही. अखेर अहमद पटेलांचा विजय झाला आणि अमित शाह चरफडले.
त्यानंतर 2018 ला कर्नाटक निवडणुकीत डी.के आणि अमित शाह पुन्हा आमने-सामने आले. विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ 79 जागा जिंकता आल्या. तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या. यावेळी जेडीएस कँपसोबत वाटाघाटी करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी पुन्हा डीकेंवर आली. ज्या डीकेंनी देवेगौडा पितापुत्रांचा पराभव केला, त्याच डीकेंनी अत्यंत सफाईदारपणे देवेगौडांना मुख्यमंत्रीपद देऊन सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपचा आणि अमित शाहांच्या स्ट्रॅटेजीचा हा दुसरा पराभव होता. त्यामुळेच गेली 30 वर्ष कर्नाटकच्या राजकारणात अँग्री यंग मॅनप्रमाणे वावरणारे डीके आहेत तरी कोण हा प्रश्न पडतो.
कॉंग्रेस नेते शिवकुमार मुंबईच्या रेनेसॉंस हॉटेल परिसरात, पोलिस बंदोबस्तात वाढ | ABP Majha
डीके शिवकुमार आहेत तरी कोण?
57 वर्षांच्या डीकेंचं पूर्ण नाव डोडनहल्ली केंपेगौडा शिवकुमार असे आहे. कर्नाटक मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्रात त्यांनी एमएची पदवी घेतली आहे. 1993 मध्ये त्यांनी उषा यांच्याशी विवाह केला. त्यांना ऐश्वर्या, आराभना आणि आकाश अशी तीन मुलं आहेत
2018 च्या निवडणूक शपथपत्रात त्यांनी 840 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. वोक्कलिगा समाजाचा कर्नाटकात त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. 1980 पासून डीके काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. 1989 मध्ये डीकेंनी सथनूर विधानसभेतून थेट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी आताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सथनूरमधून दारुण पराभव केला. 2013 मध्ये कनकपुरातून पीजीआर सिंधिया या दिग्गज नेत्यालाही त्यांनी धूळ चारली.
2019 च्या लोकसभेत 28 पैकी 25 जागा भाजपनं जिंकल्या, पण डीकेंनी आपला भाऊ सुरेश यांना तिथून निवडून आणलं. हे सर्व पाहून डीके फायटर वाटू शकतात. परंतु त्यांची दुसरी बाजूही आहे. अवैध खाणकाम प्रकरणी हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेत. शांतीनगर हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यातही त्यांचे नाव आले. डीके आणि त्यांच्या भावाने 66 एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे. तसेच 2018 साली आयकर विभागाने मारलेल्या छाप्यांमध्ये डीकेंकडे 300 कोटीची अवैध संपत्ती आढळल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी ते जामिनावर बाहेर आहेत. सध्या डीकेंचा लढाऊ बाणा चर्चेत आहे, कारण देशभर काँग्रेस कोमात आहे. म्हणून डीकेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे कानाडोळा करता येणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement