काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान करत होता मदत? लष्करी अधिकाऱ्यांची माहिती
ब्रिगेडियर ढिल्लन यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून भारतीय आणि पाकिस्तानी चलनांसह AK-47 आणि AK-74 रायफल, सात मॅगझिन, पाच किलो IED, दारूगोळा, चिनी पिस्तूल आणि काही ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत
Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत करण्यात आली, अशी माहिती एका भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच सुरक्षा दलांनी AK-47 आणि AK-74 रायफल, सात मॅगझिन, पाच किलो IED, काही दारूगोळा, एक चिनी पिस्तूल आणि काही ग्रेनेडसह भारतीय आणि पाकिस्तानी चलन दहशतवाद्यांकडून जप्त केले आहेत. असंही ते म्हणाले.
तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात LOC वर घुसखोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने शनिवारी (16 सप्टेंबर) गोळीबार (कव्हर फायर) केला आणि भारतीय लष्कराच्या ड्रोनला लक्ष्य केले, परंतु भारतीय लष्कराच्या सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. यावेळी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. उत्तर काश्मीरमधील उरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ब्रिगेडियर पी.एम.एस. ढिल्लन म्हणाले की, पाकिस्तानस्थित काही संघटनांकडून घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर उरीमधील हातलंगा येथे शनिवारी पहाटे कारवाई सुरू करण्यात आली.
दहशतवाद्यांकडून उरीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची गुप्तचर माहिती - लष्करी अधिकारी
ब्रिगेडियर म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीरमधील शांतता अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानी संघटना उरीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्तचर माहिती आम्हाला मिळाली होती, त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे.' ब्रिगेडियर ढिल्लन म्हणाले की, आज सकाळी 6.40 वाजता, तीन ते चार दहशतवादी हातलंगा भागात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले. यानंतर सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये दोन तास गोळीबार सुरू होता.
ही चकमक अर्धा तास चालली - ब्रिगेडिअर ढिल्लन
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी अंडर-बॅरल ग्रेनेड लॉन्चर (UBGL), मल्टी ग्रेनेड लॉन्चर (MGL) आणि रॉकेट लॉन्चरचा वापर करण्यात आला. तसेच ते म्हणाले की, यामध्ये 'एक दहशतवादी मारला गेला. यानंतर स्ट्राइक टीमच्या लक्षात आले की दोन जखमी दहशतवाद्यांनी आपले ठिकाण बदलले आहे. सकाळी 9.15 च्या लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दुसरी चकमक झाली, जी सुमारे अर्धा तास सुरू होती. यादरम्यान एक दहशतवादी ठार झाल्याचे ब्रिगेडिअर म्हणाले.
अशी केली दहशतवाद्यांनी घुसखोरी
ब्रिगेडियर ढिल्लन यांनी सांगितले की, तिसरा जखमी दहशतवादी जवळच्या पाकिस्तानी चौकीतून होत असलेल्या गोळीबारा दरम्यान घुसखोरी करत होता. ब्रिगेडियर म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कराकडून त्यांना घुसखोरी करण्यात मदत करण्यात आली आणि आमच्या दिशेने गोळीबार झाला. त्यांनी आमच्या ड्रोनवरही गोळीबार केला. आमच्या अंदाजानुसार, जखमी दहशतवाद्याचा पाकिस्तानी चौकीपासून 300 मीटर अंतरावर असलेल्या भागात मृत्यू झाला. येथील हवामान खूपच खराब आहे, परंतु परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
एके-47, मॅगझिन आणि एक किलो IED जप्त
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईत पाकिस्तानातील तीन दहशतवादी मारले गेले असून दोघांचे मृतदेह सापडले आहेत. ते म्हणाले की, यावरून पाकिस्तान दहशतवाद्यांना कशी मदत करतो हे दिसून येते. सुरक्षा दलांनी AK-47 आणि AK-74 रायफल, सात मॅगझिन, पाच किलो IED, काही दारूगोळा, एक चिनी पिस्तूल आणि काही ग्रेनेडसह भारतीय आणि पाकिस्तानी चलन दहशतवाद्यांकडून जप्त केले आहेत.