Ayodhya Verdict Live Update : वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना पर्यायी जागा मिळणार : सुप्रीम कोर्ट
LIVE
Background
नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज सुट्टीच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.
शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी असते. मात्र अयोध्या प्रकरणातल्या ऐतिहासिक निकालासाठी शनिवारचीच वेळ निवडण्यात आली. कदाचित न्यायालयात गर्दी होऊ नये, परिस्थिती हाताळणं सुरक्षा यंत्रणांना सोपं जावं यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला असावा, अशी शक्यता आहे.
आजच्या निकालासाठी एक नंबरचं न्यायालय खुलं केलं जाणार आहे. न्यायालयात केवळ अयोध्या प्रकरणाशी संबंध असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. 16 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. यावेळी इतर अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे इतर न्यायमूर्तीही सहभागी होते. यावेळी सर्वांनी उत्तर प्रदेशातील सुरक्षेचा आढावा घेतला होता.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असं आवाहनही पोलिसांकडून केलं जात आहे.
अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा
- जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.
- सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.
- निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
- मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.
- महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.
- निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.
- कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.
वरील सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या