Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मिरमध्ये लष्कर ॲक्शन मोडमध्ये, दोन इनकाऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या 24 तासांत सहा दहशतवादी ठार झाले आहेत.
Jammu Kashmir Encounter : जम्मू आणि काश्मिरमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे. सुरक्षा दलाकडून कारवाई चालू आहे. लष्कराला दोन वेगवेगळ्या इनकाऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितलं की, हिजबुल मुजाहिद्दीनचा जुनैद आणि बासित भट अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. गेल्या वर्षी अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच रसूल दार, त्यांची पत्नी आणि पंच यांच्या हत्येत दहशतवादी बासितचा हात होता.
कुलगामच्या मिशीपुरा भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कुलगामच्या मिशीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी दहशतवादविरोधी अभियान सुरू केलं. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीनंतर दहशतवाद्यांनी मिशीपुरान्य भागात लपण्यासाठी ठिकाण शोधलं. दरम्यान सुरक्षा दलांनी परिसरात नाकेबंदी करत आणि शोध मोहीम सुरू ठेवली, त्यानंतर गुरुवारी पुन्हा गोळीबार झाला, ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेलं. अद्यापही या परिसरात कारवाई सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
बुधवारी दोन दहशतवादी कंठस्नान
सुरक्षा दलांसोबत बुधवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. त्यापैकी एक दहशतवादी बँक व्यवस्थापकाच्या हत्येमध्ये सहभागी होता. सुरक्षा दलांनी शोपियान जिल्ह्यातील कांज्युलर येथे नाकेबंदी आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
याआधी मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानीसह लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची योजना आखत असलेल्या एका गटाचे होते.